लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी मिळून चार वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आले नसल्याचा मुद्दा आ. गोपालदास अग्रवाल यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक राजर्वधन यांच्यासमोर उपस्थित केला. तेव्हा राजवर्धन यांनी येत्या तीन महिन्यात शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे लवकरच शहर सीसीटीव्ही निगराणीत येणार आहे.जिल्ह्यातील पोलीस विभागाशी संबंधीत समस्या सोडविता याव्या यासाठी आमदार अग्रवाल यांच्या विनंतीवरून अतिरिक्त पोलीस महासंचालक राजवर्धन यांनी विभागातील अधिकाऱ्यांची मुंबई येथे बैठक घेतली. बैठकीला पोलीस गृहनिर्माण विभागाचे मिश्रा, उच्चाधिकारी माथूर, अतिरिक्त मुख्य गृहसचिव सुधीर श्रीवास्तव उपस्थित होते. बैठकीत आमदार अग्रवाल यांनी, रावणवाडी, रामनगर, व शहर पोलीस ठाणे व मनोहर चौकातील पोलीस क्वार्टस बांधकामाचा विषय उपस्थित केला.यावर मिश्रा यांनी, या कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कायार्रंभ आदेश द्यावयाचे असल्याचे सांगीतले. मात्र राजवर्धन यांनी, त्वरित कार्यारंभ आदेश देऊन पावसाळ्या पूर्वीच बांधकाम सुरू करण्याचे आदेश दिले. याशिवाय आमदार अग्रवाल यांनी, शहरात सीसीटिव्ही लावण्यासाठी सन २०१४ मध्ये दोन कोटी रुपयांचा निधी मिळाल्यानंतरही सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले नसल्याचे सांगत यावर नाराजी व्यक्त केली.राजवर्धन यांनी, याबाबत माहिती घेत संबंधीत अधिकाऱ्यांना त्वरीत कारवाई करण्याचे व तीन महिन्यांच्या आत सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिले. येत्या तीन महिन्यांत शहर सीसीटिव्हीच्या निगराणीत येणार व शहरातील गुन्हेगारी घटनांवर वचक बसेल.
शहर येणार सीसीटीव्हीच्या निगराणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 8:41 PM