अधिकारावरून वादळ : जि.प. अध्यक्षांनी केली मध्यस्थीआमगाव : पंचायत समिती आमगाव येथील सभापती हेमलता संजय डोये यांच्या अधिकारावरून उठलेले वादळ पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या अंगलट आले. अखेर जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे यांच्या मध्यस्थीने प्रकरण निवळले. अधिकाऱ्यांनी अखेर माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.आमगाव पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पदाधिकारी, सदस्य व नागरिकांशी उर्मटपणे वागणे नित्याचेच आहे. यासंदर्भात पंचायत समितीच्या सभापती हेमलता डोये यांच्या दालनात नेहमीच नागरिक आपली कैफीयत घेऊन येतात. स्वत:चा अधिकार गाजवत अधिकारी त्यांचे समाधानकारक उत्तर देत नाही. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध नेहमीच आक्रोश होताना दिसतो. यातच ५ आॅक्टोबरला सभापती दालनात शेतकरी, सामान्य नागरिक आपल्या प्रश्नांना घेऊन सभापती यांच्याशी संवाद साधत होते. सभापती यांनी सहायक गटविकास अधिकारी एम.डी.धस यांना विचारणा केली तर शेतकरी व इतरही नागरिक प्रश्न करू लागले. दालनातच उपस्थित संजय डोये यांनी अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे असे बोलून दाखविले. यातच अधिकाऱ्यांनी डोये यांना सभापतींचे नातेवाईक आहात, आपण कार्यालयात अथवा कार्यालय परिसरात फिरू नये अशी ताकीद दिली. सभापतींशीही ते उर्मटपणे वागले. त्यामुळे सभापतींनी तुम्ही माझा हक्कभंग करीत आहात, असे अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सभापती दालनातून काढता पाय घेतला. परंतु अधिकारी एम.डी.धस यांच्या या वर्तणुकीमुळे पंचायत समितीचे वातावरण तापले. सदर अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी प्रशासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला. सभापतींचा हक्कभंग झाल्यामुळे जनप्रतिनिधींमध्ये अधिकाऱ्यांच्या विरोधात रोष प्रकट होऊ लागला. सदर प्रकरणाची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी पंचायत समिती सभागृहात पदाधिकारी व अधिकारी यांची दि.६ ला समन्वय सभा आयोजित केली. या सभेत सहायक गटविकास अधिकारी एम.डी.धस यांच्या वर्तवणुकीवर पदाधिकारी व सदस्यांनी हक्कभंग आणला. (शहर प्रतिनिधी)अखेर अधिकाऱ्यांनी व्यक्त केली दिलगिरीप्रकरण तापत असल्याचे दिसताच धस यांनी झालेले प्रकारा चुकीने झाला असल्याचे मत व्यक्त करीत दिलगीरी व्यक्त केली. त्यामुळे प्रकरणाला अध्यक्ष मेेंढे यांनी मिटवण्यास सूचविले. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना समोर होण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समोर व्हावे. नागरिकांना कोणतीच असुविधा पंचायत समिती कारभारातून पुढे येऊ नये अशी ताकीदही त्यांनी दिली. या सभेत जमील खान, पं.स. सदस्य लोकेश अग्रवाल, बाजार समितीचे संचालक रामनिरंजन मिश्रा, अशोक पटले, धरमु असाटी, डॉ. गणेश हरिणखेडे, जि.प.सदस्य सुरेश हर्षे, जियालाल पंधरे व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पंचायत समितीत हक्कभंग व माफीनामा
By admin | Published: October 08, 2015 1:25 AM