लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्या असून, पुढील शैक्षणिक वर्षात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राखीव प्रवर्गातील कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जातवैधता प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडिटी) अनिवार्य आहे. त्यामुळे पालकांनी वेळेत याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आयटीआय किंवा पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेण्यासाठी जातवैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. बारावीनंतर वैद्यकीय, दंतवैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतही हे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. बहुतांश बहुतारा विद्यार्थी बारावीत असताना शाळेमार्फत जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करतात. त्यामुळे त्यांचा अर्ज प्रक्रियेत आहे की नाही आणि प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे का? याची पालकांनी पडताळणी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
नेमकी कोणती कागदपत्रे जोडण्याची आहे गरज
- महाविद्यालयाचे शिफारस पत्र
- १६ 'अ' फॉर्मवर प्राचार्यांची सही आणि शिक्का
- चालू वर्षाचे बोनाफाइड प्रमाणपत्र
- जातीविषयक सर्व पुरावे आणि विहित नमुन्यातील शपथपत्र
- सर्व मूळ कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक आहे.
अर्ज कोठे करणार?
- विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असलेल्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारशींसह सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल.
- बहुतांश विद्यार्थी ११ वी किंवा १२ वीमध्ये असताना शाळेमार्फत अर्ज सादर करतात. मात्र, काही विद्यार्थी याकडे दुर्लक्ष करतात. अशा विद्यार्थ्यांनी आता सतर्क व्हावे.
पालकांनो, याकडे लक्ष द्या !
- जातवैधता प्रमाणपत्राशिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
- शाळा किंवा महाविद्यालयामार्फत अर्ज सादर केला आहे का? याची पालकांनी खातरजमा करावी.
- उशिरा अर्ज केल्यास प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात, त्यामुळे 3 वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.