केशोरी : जिल्ह्यातील कोरोना महामारीच्या वाढत्या संकटामुळे रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आपात्कालीन परिस्थिती उग्ररूप धारण कीू नये या दृष्टीने पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा इयत्ता पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग तात्पुरत्या स्वरुपात ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.
शाळा बंद असल्या तरीही जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग ऑनलाइन सुरू राहतील तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचे वर्ग कोविड-१९ च्या संदर्भात सुरक्षाविषयक नियमांचे पालन करून पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आवश्यकतेनुसार नियमित उपस्थित राहतील. शिक्षक शाळेत येऊन ऑनलाइन वर्ग घेतील तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेकरिता परीक्षा मंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या निर्देशानुसार काम करतील. सर्व माध्यमांच्या शाळांनी कोविड-१९ च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास किंवा विरोध दर्शविल्यास सबंधिताविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा भारतीय दंड संहिता तसेच साथरोग कायद्यान्वये कायदेशीर केली जाणार आहे.
.........
परीक्षांचे काय होणार, विद्यार्थी व पालकांना चिंता
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा गेल्या वर्षभरापासून ऑनलाइन सुरूच आहे. त्यात आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पाचवी ते अकरावीपर्यंतच्या शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. ३० एप्रिलपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. शालेय परीक्षांचा हाच कालावधी असल्याने यंदाही पाचवी ते नववीपर्यंतच्या परीक्षा होणार की नाही, अशी चिंता विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना लागली आहे.
.......
दहावी व बारावीच्या परीक्षांवर कोरोनाचे संकट
दहावी आणि बारावीच्या परीक्षा याच महिन्यात होऊ घातल्या आहेत. त्यातच आता कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला असल्याने अशा स्थितीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर यामुळे पालकांची चिंतासुध्दा वाढली आहे.