केशोरी : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होताच शासनाने लॉकडाऊन शिथिल करून व्यवहार नियमित सुरू केले आहेत. कोरोनामुक्त गावांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचे दृष्टीने पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
याच अनुषंगाने केशोरी येथे ग्रामपंचायत स्तरावर सरपंच नंदू पाटील गहाणे यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करून आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग असणाऱ्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे ज्या गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करावयाचे आहेत. त्या गावात किमान महिनाभरापूर्वीपासून एकही कोरोनाबाधित रुग्ण नसावा अशा गावात शाळा सुरू करण्यासंबंधी ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याचे निर्देश तथा मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या होत्या. त्या संदर्भाने केशोरी येथे ग्रामपंचायत भवन सरपंच नंदू पाटील गहाणे यांचे अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करून समिती गठीत करून पालकांचे अभिप्राय घेऊन शाळा सुरू करण्यासंबंधीचा निर्णय बहुमताने मंजूर करण्यात आले. यामध्ये सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, नियंत्रित सदस्य म्हणून वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, केंद्रप्रमुख उपस्थित होते.