गोंदिया : राज्यातील कोरोनाच्या उद्रेकाचे पडसाद आता जिल्ह्यातही दिसायला सुरुवात झाली असून, रविवारी (दि.१४) त्याचा पहिला झटका बसला आहे. रविवारी जिल्ह्यात तब्बल ४१ बाधितांची भर पडली असून, या नववर्षातील बाधितांची ही पहिलीच सर्वाधिक आकडेवारी आहे, तर २० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ायानंतर आता मात्र कोरोना जिल्ह्यात आपले पाय पसरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारच्या या आकडेवारीनंतर आता जिल्ह्यातील बाधितांची संख्या १४७०६ झाली असून, १४३१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा हा कहर विदर्भातील काही जिल्ह्यांत जास्तच दिसून येत होता. मात्र, आता अवघ्या राज्यातच त्याचे पडसाद दिसून येत आहे. विशेष म्हणजे, लगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच हळुवार का असेना मात्र जिल्ह्यातही रुग्ण वाढताना दिसत होते. अशात मात्र रविवारी (दि.१४) जिल्ह्यात तब्बल ४१ नवीन बाधितांची भर पडली असून, यानंतर मात्र जिल्ह्यातही कोरोना उद्रेकाचे स्पष्ट संकेत मिळून येत आहेत. यामुळे मात्र आता नागरिकांनी हलगर्जीपणा सोडून अधिकाधिक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
रविवारी जिल्ह्यात आढळून आलेल्या या ४१ रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील ३१, तिरोडा १, गोरेगाव १, आमगाव २, सालेकसा १, देवरी ३, सडक-अर्जुनी १, तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १ रुग्ण आहे, तसेच २० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील १५, तिरोडा १, आमगाव ३ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १ रुग्ण आहे. यानंतर आता जिल्ह्यात २०९ क्रियाशील रुग्ण असून, यात गोंदिया तालुक्यातील १३३, तिरोडा ११, गोरेगाव ७, आमगाव २३, सालेकसा ८, देवरी १५, सडक-अर्जुनी ६, अर्जुनी-मोरगाव ४, तर इतर राज्य व जिल्ह्यातील २ रुग्ण आहेत. यातील १५८ रुग्ण घरीच अलगीकरणात असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील १०५, तिरोडा ८, गोरेगाव ४, आमगाव १९, सालेकसा ५, देवरी १०, सडक-अर्जुनी ४, तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३ रुग्ण आहेत. या स्थितीनंतर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३० टक्के असून, मृत्युदर १.२० टक्के, तर द्विगुणित गती ३८०.२ दिवस एवढी नोंदण्यात आली आहे.
-----------------------------
आतापर्यंत १८७ रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात कोरोनाच्या कहरामुळे आतापर्यंत १८७ रुग्णांचा जीव गेला आहे. तालुकानिहाय बघितल्यास गोंदिया तालुक्यातील १०५, तिरोडा २४, गोरेगाव ६, आमगाव १३, सालेकसा ३, देवरी १०, सडक-अर्जुनी ५, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ११, तर इतर राज्ये व जिल्ह्यातील १० रुग्ण आहेत.
-----------------------
१,५८६४८ कोरोना चाचण्या
कोरोनाचा वाढता उद्रेक बघता आता जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १,५८६४८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ८३,२०३ आरटी-पीसीआर चाचण्या असून, यात ८,७३८ पॉझिटिव्ह, तर ७००१९ निगेटिव्ह आहेत, तसेच ७५४४५ रॅपिड अँटिजन चाचण्या असून, यातील ६,२७३ पॉझिटिव्ह, तर ६९१७२ निगेटिव्ह आल्या आहेत.
----------------------
सर्वच तालुक्यांत आढळताहेत बाधित
कोरोनाचा उद्रेक बघता आरोग्य विभागाने कोरोना चाचण्यांची संख्या वाढवून दिली आहे. यामुळे रविवारी सर्वच तालुक्यांत कोरोनाबाधित आढळून आले आहेत. नववर्षात जिल्ह्यातील आठही तालुक्यांत बाधितांची भर पहिल्यांदाच पडली असावी. मात्र, यानंतर आता अवघ्या जिल्ह्याला कोरोनाने विळखा घातला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे आता फक्त नागरिकांची खबरदारीच जिल्ह्याला उद्रेकापासून वाचवू शकणार आहे.