लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्य शासनाने पुन्हा एकदा लग्न सोहळ्यांवर काही निर्बंध लावले आहेत. मात्र शहरात या निर्बंधांना बगल दिली जात आहे. विशेष म्हणजे, यासाठी सभागृह व हॉटेल्सवाले वेगवेगळ्या शक्कल लढवित असून बंद दाराआड लग्न सोहळे धडाक्यात सुरूच असल्याचे दिसून येत आहे. राज्यात आता कोरोना पुन्हा फोफावला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेत राज्य शासनाने लग्न सोहळे व गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध लावले असून ५० पेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत असे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनीही जिल्हयासाठी आदेश काढले आहेत. मात्र या निर्बंधांना जिल्हयात बगल देत लग्न सोहळे धडाक्यात सुरूच असल्याचे दिसून येत आहे. यात ५० पेक्षा जास्त व्यक्ती असू नये असे स्पष्ट आदेश असतानाही शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत हे लग्न सोहळे आटोपले जात आहेत. अशात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार यात शंका नसून जिल्ह्यात पुन्हा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे ही बाब नक्कीच गंभीर आहे. मात्र होत असलेली कमाई हातून जावू नये यासाठी सभागृह व हॉटेल्सवालेही वेगवेगळी शक्कल लढवून लग्नसोहळे आटोपून घेत आहेत. यासाठी रात्री ठरवून दिलेल्या १० वाजतानंतर सभागृह व हॉटेल्सचे दार बंद करून आतमध्ये कार्यक्रम सुरूच असल्याचेही ऐकीवात असून तशा तक्रारीही येत आहेत. विशेष म्हणजे, अशाप्रकारे आयोजन केले जात असले तरिही हा प्रकार पुढे जाऊन धोकादायक ठरणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
ना तपासणी ना कारवाई गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार नगर परिषद- नगर पंचायत मुख्याधिकारी व संबंधित विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील मंगल कार्यालय, लॉन, कोचिंग क्लासेस आदी गर्दी होणाऱ्या ठिकाणी अचानक भेट देऊन तपासणी करावयाची आहे. तसेच मर्यादेपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास उचत दंड आकारावा किंवा कारवाई कराव असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे. मात्र जिल्हा व शहरात असे होत नसल्याने लग्न सोहळे धडाक्यात आटोपले जात असल्याचे चित्र आहे.वाहनांची पार्कींग अन्य ठिकाणीसभागृह व हॉटेल्समध्ये लग्न सोहळे व अन्य कार्यक्रमात येणाऱ्यांचे वाहन समोरच लावल्यास कारवाईची भीती आहे. अशात या सभागृह व हॉटेल्स वाल्यांकडून कार्यक्रमात आलेल्या लोकांचे मोजकेच वाहन समोर लावले जात आहेत. तर अन्य वाहनांची पर्कींग मात्र अन्यत्र केली जात आहे. अशात कुणी पाहणी करण्यासाठी आले तरिही वाहनांना बघून त्यांना गर्दीचा अंदाज येणार नाही. मात्र बंद दाराआड गर्दीत कार्यक्रम आटोपले जात असल्याच्या तक्रारी आहेत.