लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची राईस मिलर्ससह करार व भरडाई करून सीएमआर तांदूळ भारतीय खाद्य महामंडळाकडे जमा केला जातो. त्यानंतर या तांदळाचे पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशन दुकानांना पुरवठा केला जातो. भरडाई केलेला सीएमआर तांदूळ गोदामात जमा करणे आवश्यक आहे. मात्र हा तांदूळ रजिस्टरवर केवळ गोदामात जमा केल्याचे दाखवून परस्पर वितरित होत असल्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती आहे. पूर्व विदर्भात सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी हमीभावाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून खरेदी केला जातो. यानंतर खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससह करार केला जातो. त्यानंतर राईस मिलर्स धानाची भरडाई करून सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा करतात. यानंतर पुरवठा विभागाच्या माध्यमातून या राज्यातील विविध स्वस्त धान्य दुकानांना शासनाच्या निर्देशानुसार पुरवठा केला जाताे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी, स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा करण्यात येणाऱ्या तांदळाची गुणवत्ता योग्य राहावी यासाठी ज्या जिल्ह्यात तांदूळ पाठविला जाणार आहे त्या जिल्ह्यातील एका कर्मचाऱ्याची क्वालिटी नियंत्रक म्हणून पुरवठा विभागाच्या गोदामात नियुक्ती केली जाते. राईस मिलर्सनी मिलिंग केलेला सीएमआर तांदूळ गोदामात जमा होऊन त्याचे वितरण होणे आवश्यक आहे. मात्र काही मिलिंग केलेल्या काही तांदळाची एन्ट्री केवळ नावापुरतीची रजिस्टवर केली जात असून ट्रकमधून हा धान संबंधित जिल्ह्यात पाठविला जात असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे संबंधित विभागाच्या यंत्रणेने या संपूर्ण प्रकरणाची चाचपणी करून यातील दूध का दूध आणि पाणी करण्याची गरज आहे. यासंदर्भात पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता संपूर्ण प्रक्रिया ही पारदर्शकपणे सुरू असल्याचे सांगितले.
हिंगोलीचा तांदूळ सडक अर्जुनीत - शनिवारी (दि.२८) हिंगोली येथून भरडाई केलेला एक ट्रक तांदूळ सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे दाखल झाला. ही बाब येथील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या लक्षात येताच त्यांनी ट्रक ड्राव्हरकडे याची चौकशी केली. या तांदळाची मिलिंग तेथील एका राईस मिलमध्ये करण्यात आली. त्याची पावतीसुध्दा होती. गोंदिया जिल्ह्यातूनच तांदूळ मोठ्या प्रमाणात पाठविला जात असून हिंगोलीचा तांदूळ गोंदिया का? हे एक न उलगडणारे कोडे आहे. रेशनचे धान्य पुन्हा रेशन दुकानात- केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेतून रेशनकार्डधारकांना मोफत तांदळाचे वाटप केले जात आहे. मात्र काही लाभार्थी या तांदळाची परस्पर दुकानदारांना विक्री करतात. काही विक्रेते या तांदळाची काही राईस मिलर्स विक्री करीत असून ते या तांदळाची खरेदी करून भरडाई केलेल्या तांदळात पाला करून शासनाकडे जमा करीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे रेशनचे तांदूळ पुन्हा रेशनच्या दुकानात असा प्रकार सुरू असल्याचे बोलल्या जाते.