गोंदिया : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने शासनाने निर्बंध शिथिल केले होते. मात्र, यात कोचिंग क्लासेस आणि आठवडी बाजारावरील निर्बंध कायम ठेवले होते. मात्र, जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याने जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी मंगळवारी (दि.१०) कोचिंग क्लासेस आणि आठवडी बाजार ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील आठवडी बाजार पूर्णपणे बंद करण्यात आले होते. यामुळे भाजीविक्रेत्यांसह ग्रामीण भागातील नागरिकांना सुद्धा याचा फटका बसत होता. तर आठवडी बाजाराच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला महसूल प्राप्त होतो. तो सुद्धा आठवडी बाजार बंद असल्याने बुडत होता. त्यामुळे ग्रामपंचायतींना आर्थिक फटका बसत होता. कोरोनामुळे आधीच ग्रामपंचायतींना प्राप्त होणाऱ्या उत्पन्नामध्ये घट झाली आहे. त्यातच आठवडी बाजार बंद असल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागत होते. तर ग्रामीण भागातील नागरिक आठवडी बाजारातूनच दैनंदिन आवश्यक वस्तू आणि भाजीपाल्याची खरेदी करीत असतात; पण बाजार बंद असल्याने त्यांना सुद्धा अतिरिक्त पैसे मोजून भाजीपाला खरेदी करावा लागत होता. त्यामुळेच कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर आठवडी बाजार पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली जात होती. याचीच दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी यासंदर्भातील आदेश काढून आठवडी आणि गुरांचे बाजार ५० टक्के क्षमतेने नियमांचे पालन करून सुरू करण्यास परवानगी दिली. तर कोचिंग क्लासेससुद्धा मागील दीड वर्षापासून बंद होते. त्यामुळे कोचिंग क्लासेस संचालक आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. मात्र, कोचिंग क्लासेस, शासकीय, निमशासकीय, खासगी प्रशिक्षण केंद्र, वाचनालय, संगणक प्रशिक्षण केंद्र आणि स्पर्धा परीक्षा केंद्र ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी बुधवारपासून (दि.११) करण्यात येणार आहे. या सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.
............
समित्यांची राहणार नजर
जिल्हाधिकाऱ्यांनी कोचिंग क्लासेस आणि आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तसेच यात नियमांचे पालन केले जावे यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून दिली असून समितीदेखील गठित केली आहे. शहरी भागात उपविभागीय अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांच्यावर तर ग्रामपंचायत स्तरावर पोलीस निरीक्षक, सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित केली आहे.
.............
नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई
कोचिंग क्लासेस आणि आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी देताना त्यांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून नियमांचे पालन होते किंवा नाही, याची पाहणी करून कारवाई करण्याची जबाबदारी समितीवर सोपविली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.