गोंदिया : सध्या प्रखरतेने सूर्य आग ओकत आहे. दुपारच्या वेळी तळपत्या उन्हात बाहेर पडू नये असा सल्ला दिला जात आहे. सूर्य पृथ्वीच्या मध्यावर म्हणजेच विषुवृत्तावर येत असल्याने उन्हाची झळ मोठ्या प्रमाणात पोहोचत आहे. गोंदियाचे तापमान ४० अंशाच्या वर गेल्याने उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तिने उन्हापासून बचाव करावा असे आवाहन करीत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) ‘कोल्ड रुम’ तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यंदा मार्च महिन्यातच उन्हाचे चटके लागत असल्यामुळे आरोग्य विभागाने महिनाभरापुर्वी उन्हापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांनी एक बैठक घेऊन जिल्हावासीयांना आव्हान केले आहे. प्रत्येक ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात कोल्ड रुमची व्यवस्था केली आहे. यंदा तापमान जास्त असल्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्यापर्यंत उष्माघाताचा एकही रुग्ण दाखल झाला नाही. (तालुका प्रतिनिधी) उन्हापासून बचावासाठी अशी घ्या काळजी तहान लागलेली नसताना जास्तीत-जास्त पाणी प्यावे, हल्की, पातळ, व सछिंद्र सुती कपडे वापरावे, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करण्यात यावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तिंनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा, ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकरण्यात यावा, शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी तयार केलेली लस्सी, तोरणी, लिंबू पानी, ताक यांचा नियमित वापर करावा, अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम हे उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे आहेत. चक्कर येत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पुरेसे पाणी दयावे, घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनसेडचा वापर करावा, रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्या, पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा, थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे, कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे. पहाटेच्या वेळी जास्तीत-जास्त काम आटोपावे, बाहेर काम करीत असताना मध्ये ब्रेक घेऊन आराम करावा, गरोदर महिला व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी, हे करणे टाळावे लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वहानात ठेवू नये, दुपारी १२ ते ३.३० या काळात बाहेर पडने टाळावे, गडत, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत, उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करणे टाळावे, मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.
प्रत्येक ‘पीएचसी’त ‘कोल्ड रुम’
By admin | Published: April 01, 2017 2:20 AM