लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वडिलांच्या नावाने असलेला किरकोळ फटाका विक्रीचा परवाना हस्तांतरित करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागून स्वीकारणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहायकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. पथकाने बुधवारी (दि.१३) ही कारवाई केली असून राजेश अच्युतन मेनन असे लाचखोर स्वीय सहायकाचे नाव आहे. सविस्तर असे की, तक्रारदारांचे हार्डवेअर व भांडे विक्रीचे दुकान असून वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या नावावर असलेल्या किरकोळ फटाका विक्रीचा परवाना हस्तांतरित करण्यासाठी तक्रारदाराच्या भावाने जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. मेनन याने हे काम करून देण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली होती. तर तक्रारदाराने बँकेत चालान भरून त्याची पावती जमा केली व त्यानंतर मेनन यांना भेटले असता त्याने ११ हजार रुपयांची मागणी केली. यावर तक्रारदाराने बुधवारी (दि.१३) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली. त्याआधारे पडताळणी अंती पथकाने बुधवारी सापळा लावला असता मेनन याने परवाना हस्तांतरित करून देण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी करून पंचांसक्षम रक्कम स्वीकारली असता पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. मेनन विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.