गोंदिया : स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. असिम त्याग, साहस, कर्तव्याची पूर्ती यामुळे आज आपण स्वांतत्र्यांची ७४ वर्षे पूर्ण केली असून अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. भारतीय संविधानाने व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रत्येकाला अधिकार बहाल केले आहेत. सध्याच्या काळात देशासह जगावर कोरोना महामारीचे संकट ओढवले असून अनेक घटक आपली जबाबदारी पूर्ण करीत आहेत. देशाला संकटातून पुढे नेण्यासाठी अधिकाराबरोबरच कर्तव्यांची पूर्ती करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून कर्तव्यासाठी पुढे यावे, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांनी केले.
येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी त्यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.
पुढे बोलताना त्यांनी, कोविड काळात महाविद्यालयीन शिक्षण ऑनलाईनच्या माध्यमातून देण्यात येत आहे. आपला परिसर हा ग्रामीण भागातील असल्याने ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांना जोडणे कठीण कार्य होते. परंतु नमाद महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. या कार्यात महाविद्यालय यशस्वी झाले. विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षांना विद्यार्थी अनुपस्थित राहू नयेत, यासाठी महाविद्यालयाने विशेष परिश्रम घेतल्याचेही सांगितले.
यावेळी एनएसएसचे प्रा. बबन मेश्राम यांचा उल्लेखनीय कार्यासाठी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.