गोंदिया : मागील मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना बाधितांचा ग्राफ वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर सातत्याने कोरोनाचा तीन अंकी पाढा सुरू होता. त्यामुळेच मागील तीन महिन्यांत जिल्ह्यात जवळपास १८ हजारांवर रुग्णांची भर पडली आहे. मात्र, काही दिवसांपासून पुन्हा रुग्णसंख्येत घट होण्यास सुरुवात झाली आहे, तर रविवारी (दि.२३) दोन महिन्यांच्या कालावधीनंतर रुग्णसंख्या प्रथमच दोन अंकी आली. त्यामुळे जिल्ह्यातून आता निश्चितच कोरोनाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्याचे दिलासादायक चित्र आहे.
जिल्ह्यात मागील दहा ते पंधरा दिवसांपासून कोरोना बाधितांच्या टेस्ट वाढवून देखील रुग्णसंख्येत होत आहे. हे कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्याचे स्पष्ट संकेत आहेत. सद्य:स्थितीत ३ हजारांवर आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजन टेस्ट केल्या जात आहे. मात्र, यानंतर फार कमी प्रमाणात रुग्ण निघत आहेत. ही जिल्हावासीयांसाठी समाधानकारक बाब आहे. रविवारी जिल्ह्यात २६४ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली तर २९ नवीन रुग्णांची नोंद झाली. ४ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाधितांच्या संख्येत घट होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे; पण बाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असल्याने थोडी चिंता कायम आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १५५२४६ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १२९९६२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १५०६९६ जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १२९९५२ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४०१५७ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी ३८७७६ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर ६६६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत ७१५ काेरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ६९० स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
........
जिल्ह्याचा रिकव्हरी दर राज्यापेक्षा सरस
कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्याचा रिकव्हरी दर ९६.५६ टक्के असून राज्याचा रिकव्हरी दर ९२.०५ टक्के आहे. रिकव्हरी दरात सातत्याने वाढ होत असल्याने जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
.....
२८१९ चाचण्या २९ पॉझिटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने २२५० रॅपिड अँटिजन टेस्ट तर ५६९ आरटीपीसीआर अशा एकूण २८१९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २९ कोरोनाबाधित आढळले. कोरोनाबाधितांचा पाॅझिटिव्हिटी रेट १.०३ टक्के आहे, तर कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र कायम असल्याने मृत्यूदर १.६२ टक्क्यावर पोहचला आहे.
......
रुग्णसंख्येत घट झाल्याने १३१४ खाटा उपलब्ध
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७१५ वर आली आहे. डीसीएच, कोविड केअर सेंटर आणि शासकीय आणि खासगी कोविड रुग्णालयातील सद्य:स्थितीत एकूण १३१४ खाटा उपलब्ध आहेत.