गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. तर मागील आठ दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या चाचण्यांचे प्रमाण आणि त्यात आढळणाऱ्या पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता आता हळूहळू कोरोनाने जिल्ह्यातून काढता पाय घेण्यास सुरुवात केल्याचे दिलासादायक चित्र आहे. बाधित रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १ हजाराच्या आत आली आहे. त्यामुळे जिल्ह्याची आता कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरुवात झाली आहे. मात्र यानंतरही आणखी काही दिवस नागरिकांना पूर्वीएवढेच सजग राहून स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घ्यावी लागणार आहे.
जिल्ह्यात शनिवारी (दि.२२) ६२६ बाधितांनी कोरोनावर मात केली तर १०५ नवीन रुग्णांची नोंद झाली. ३ रुग्णांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत असून ग्रामीण भागातसुध्दा कोरोनाबाधितांची संख्या बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ९५४ वर आली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५३ हजार ६०२ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १२७२५४ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १४९७१४ बाधितांचे नमुने टेस्ट करण्यात आले. त्यापैकी १२९००० हजार नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४०१२८ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी ३८५१२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ९५४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १८१५ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
........
३१३६ नमुन्यांची चाचणी १०५ पॉझिटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शनिवारी एकूण ३१३६ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात १०३९ रॅपिड अँटिजन तर २०९७ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यापैकी १०५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. याचा पॉझिटिव्हिटी रेट ३.३४ टक्के आहे. शुक्रवारपेक्षा पॉझिटिव्हिटी रेट शनिवारी १ टक्क्याने कमी झाला.
.........
प्रलंबित स्वॅब नमुन्यांची संख्या पुन्हा वाढतेय
कोरोना संसर्गाला घेऊन नागरिकांमध्ये जनजागृतीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिक स्वत:हून चाचणी करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने प्रयोगशाळेवरील ताण पुन्हा वाढला असून हजाराच्या वर स्वॅब नमुने प्रलंबित राहत आहेत. शनिवारी १८१५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे.
........
रिकव्हरी दर ९६ टक्क्यांवर
मागील आठवडाभरापासून कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या चारपट वाढली आहे. त्यामुळे कोरोनाचा रिकव्हरी दर वाढला असून आता ९५.९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. आठवडाभराच्या कालावधीत १० टक्क्यांनी रिकव्हरी रेट वाढला आहे. तर लसीकरणालासुध्दा गती आली असून आतापर्यंत २ लाख २२ हजार १९३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.