गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. मागील आठ दहा दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून कोरोनावर मात करणाऱ्यांचा ग्राफ उंचावला आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला आहे. बाधितांच्या आकड्यात झालेली घट नेमकी चाचण्या कमी झाल्याने की आणखी कुठल्या कारणाने हादेखील सध्या चर्चेचा विषय झाला आहे.
शनिवारी (दि.८) जिल्ह्यात ४७६ बाधितांनी कोरोनावर मात केली तर ३१० नवीन रुग्णांची नोंद झाली. ७ बाधितांचा उपचारादरम्यान शासकीय व खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. शनिवारी आढळलेल्या ३१० बाधितांमध्ये सर्वाधिक १६५ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा २२, गोरेगाव ३८, आमगाव २०, सालेकसा १३, देवरी १५ सडक अर्जुनी १९, अर्जुनी मोरगाव १४ व बाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १३९०४७ जणांचे स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आले. यापैकी ११४७८३ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत १४१९६४ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी १२१९५६ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६४११ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी ३१७५२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ४०७२ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर १३३० स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
.............
रुग्णसंख्येतील घट नेमकी कशामुळे
मागील आठ दहा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने खाली येत आहे. ही दिलासादायक बाब आहे; पण दुसरीकडे चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याची ओरड सुरू आहे. चाचण्या कमी केल्यामुळे रुग्ण संख्येत घट झाली असेल तर पुढे कोरोनाचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.
........
१ लाख ७५ हजार नागरिकांचे लसीकरण
कोरोनाला आळा घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण उपयुक्त आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ७५ हजार ८७५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. याअंतर्गत १ लाख ३३ हजार नागरिकांना कोरोनाचा पहिला तर ३३१२८ नागरिकांना काेरोनाचा दुसरा डोस देण्यात आला आहे.