गोंदिया : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शासनाने ब्रेक चेन अतंर्गत नवीन निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमुळे कोरोनाची साखळी खंडित करण्यात बऱ्याच प्रमाणात यश आले आहे. जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या घटत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. कोरोनाचा ग्राफ डाऊन झाल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतसुद्धा बऱ्याच प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू झाल्याचे चित्र आहे.
मंगळवारी (दि. ११) जिल्ह्यातील ५५९ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ५०० रुग्णांची नोंद झाली. आठ बाधितांचा उपचारादरम्यान खासगी व शासकीय रुग्णालयांत मृत्यू झाला. मंगळवारी आढळलेल्या ५०० रुग्णांमध्ये सर्वाधिक १६४ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा ३०, गोरेगाव ४६, आमगाव ४९, सालेकसा ७४, देवरी ८३, सडक अर्जुनी १४, अर्जुनी मोरगाव ३७, बाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे, तर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ऑक्सिजन आणि रुग्णालयातील बेडची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. ऑक्सिजन आणि बेडबाबत कुठलीच ओरड नसून, पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १,४०,३८७ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले आहेत. त्यापैकी १,१६,४७३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिट अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत १,४३,२४२ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,२२,९२२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३८,०४६ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी ३३,४३३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ४००२ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, ३३८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
.............
राज्यापेक्षा जिल्ह्याचा रिकव्हरी दर सर
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून, मात करणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या कोरोना रिकव्हरी दरात वाढ झाली आहे. राज्याचा रिकव्हरी दर ८६ टक्के असून, जिल्ह्याचा रिकव्हरी दर ८७.८७ टक्के आहे. कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ झाल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.
...............
लसीकरण मोहिमेला आली गती
जिल्ह्यात मंगळवारपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी ११० केंद्रांवरून सोय उपलब्ध करून देण्यात आली. यासाठी जवळपास ११ हजार कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारपासून लसीकरण मोहिमेला वेग आल्याचे चित्र होते.