गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आता जिल्ह्यात पूर्णपणे आटोक्यात आली आहे. रुग्णसंख्येला सुद्धा उतरती कळा लागली आहे. जुलै महिन्यात सलग पाचव्यांदा शून्य कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून कोरोना आता पूर्णपणे हद्दपार होत असल्याचे समाधानकारक चित्र आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शनिवारी (दि.२४) ४८० स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ४०६ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ७३ नमुन्यांची रॅपिड अँटिजन करण्यात आली. यात एकही नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य टक्के आहे. जून महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळेच कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दहावर आली आहे. तीन तालुके कोरोनामुक्त झाले असून, उर्वरित पाच तालुक्यांत सुद्धा दोन-तीन कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोना संसर्गाच्या आनुषंगाने आतापर्यंत एकूण २,१३,९६६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १,८८,७६७ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत २,२१,५१७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २,००,४२८ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४१,१८० कोरोनाबाधित रुग्ण आढळले यापैकी ४०,४६९ जणांनी कोरोनावर मात केली. सद्य:स्थितीत दहा कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, १०३ नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.
..................
कोरोनाचा रिकव्हरी रेट ९८.२७ टक्क्यांवर
जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा रिकव्हरी रेट सातत्याने वाढत आहे. जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट ९८.२७ टक्के असून, तो राज्यापेक्षा अडीच टक्क्यांनी अधिक आहे.
................
४२ टक्क्यांवर नागरिकांचे लसीकरण
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळेच लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ५४ हजार ९६० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्याची टक्केवारी ४२ टक्के आहे.