गोंदिया : जिल्ह्यातील सालेकसा आणि सडक अर्जुनी या दोन तालुक्यातील दोन रुग्णांचा डेल्टा प्लसचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सध्या हे दोन्ही रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने गुरुवारी या दोन्ही गावातील ३०० नागरिकांचे स्वॅब नमुने घेतले होते. या सर्व नमुन्यांची कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने तपासणी केली असता सर्व नमुने निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले होते. त्यातच गोंदिया जिल्ह्यातील दोन रुग्णांचे नमुने सुध्दा पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेकडून बुधवारी जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाला. मात्र हा अहवाल तब्बल दोन महिन्यानंतर प्राप्त झाला. तर ज्या रुग्णांचा डेल्टा प्लसचा अहवाल पॉझिटिव्ह आला ते दोन्ही रुग्ण ठणठणीत आहे. त्यांना कुठलाही त्रास नसून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची सुध्दा गरज पडली नव्हती. मात्र आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या दोन्ही गावातील ३०० नागरिकांचे स्वॅब नमुने गुरुवारी घेऊन ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. याचा अहवाल शनिवारी (दि.१४) प्राप्त झाला. या दोन्ही गावातील नागरिकांचे घेतलेले सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. मात्र यानंतरही अलर्ट राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाला करण्यात आल्या आहे.
............
आता नमुने पाठविण्याची गरज
डेल्टा प्लसचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या सालेकसा आणि सडक अर्जुनी तालुक्यातील त्या दोन्ही गावातील ३०० नागरिकांचे स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले. त्यामुळे आता हे नमुने डेल्टा प्लसच्या अनुषंगाने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याची गरज नसल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. व्ही.पी.रुखमोडे यांनी सांगितले.
...........
दर १५ दिवसांनी पाठविणार नमुने
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहे. मात्र डेल्टा प्लसचे दोन रुग्ण आढळल्याने आता कोरोना बाधितांचे नमुने दर १५ दिवसांनी पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहे.