गोंदिया : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या बाधित रुग्णांपेक्षा वाढली आहे. तर बाधित रुग्णांची संख्यासुध्दा दीडशेच्या आतच आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. मात्र रुग्ण संख्येत घट झाली म्हणून नागरिकांनी बिनधास्त न वागता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. तरच कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करणे शक्य होईल.
जिल्ह्यात शनिवारी (दि.१५) ४२२ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. तर ११८ नवीन रुग्णाची नोंद झाली. ७ बाधितांचा उपचारादरम्यान खासगी आणि शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. शनिवारी आढळलेल्या ४२२ बाधितांमध्ये सर्वाधिक ४० रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ७, गोरेगाव ६, आमगाव १०, सालेकसा २६, देवरी ११, सडक अर्जुनी ५, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १३ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या देान दिवसांपासून सर्वच तालुक्यात कोरोना बाधितांचे आकडे कमी झाले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात सुध्दा संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी अधिक काळजी घेतल्यास जिल्ह्याची लवकरच कोरोनामुक्तीच्या दिशने वाटचाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १४२७५८ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ११८७०८ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यांतर्गत १४५५९९ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १२५०६९ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९२०१ कोराेना बाधित आढळले असून यापैकी ३५१८० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थिती ३३९० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १२५ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयाेगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
............
कंटेन्मेंट झोनची संख्या झाली कमी
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या बरीच कमी झाल्यानेे ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सुध्दा घट झाली आहे. त्यामुळे ६६ कंटेन्मेंट झोनची संख्या आता ४५ वर आली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येत असल्याचे समाधानकारक चित्र आहे.
.............
आतापर्यंत ६३१ बाधितांचा मृत्यू
कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी कोरोना बाधितांच्या मृत्यूचे सत्र मात्र सुरूच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक ३६५ रुग्णांचा मृत्यू हा एप्रिल महिन्यात झाला आहे. कोरोना बाधित मृतकांमध्ये गंभीर आजार असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
................