गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, जिल्ह्यात बाधितांची संख्या झपाट्याने घसरत चालली आहे. जिल्हावासीयांसाठी ही आनंदाची बाब असून, त्यात आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे, मंगळवारी (दि.१५) सात तालुक्यात क्रियाशील रुग्ण संख्या १५ च्या आत नोंदविण्यात आली आहे. म्हणजेच, या तालुक्याची आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल दिसत आहे. मात्र गोंदिया तालुक्यात सर्वाधिक ३५ क्रियाशील रुग्ण आहेत. यामुळे जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी थोडा वेळ लागणार असून, यासाठी जिल्हावासीयांच्या सहकार्याची गरज आहे.
मागील वर्षी देशात कोरोनाचा शिरकाव झाला व तेव्हापासून आता सुमारे दीड वर्षांचा कालावधी होत आहे. कोरोनाचा कहर सुरूच आहे. मागील महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येऊन गेली व त्याचा प्रादुर्भाव आता ओसरत आहे. परिणामी, ९००-१००० बाधितांची संख्या आता एक अंकावर आली असून, ही जिल्ह्यासाठी नक्कीच दिलासादायक बाब आहे. विशेष म्हणजे, आजघडीला जिल्ह्यातील सात तालुक्यात १५ च्या आत क्रियाशील रुग्ण असून, या तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल दिसून येत आहे. तर सुरुवातीपासूनच हॉटस्पॉट असलेल्या गोंदिया तालुक्यात सर्वाधिक ३५ क्रियाशील रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे.
जिल्ह्यातील या सात तालुक्यात मंगळवारी नोंदविण्यात आलेल्या क्रियाशील रुग्णात सर्वात कमी तीन क्रियाशील रुग्ण सडक अर्जुनी तालुक्यात नोंदविण्यात आले आहेत. त्यानंतर देवरी तालुक्यात चार क्रियाशील रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील कोरोनाचा दुसरा हॉटस्पॉट असलेल्या तिरोडा तालुक्यात ११ क्रियाशील रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे.
-------------------------------
तालुकानिहाय क्रियाशील रुग्णांचा तक्ता
तालुका क्रियाशील रुग्ण घरीच अलगीकरणात
गोंदिया ३५ २७
तिरोडा ११ ०९
गोरेगाव ११ १०
आमगाव १७ १३
सालेकसा १५ १२
देवरी ०४ ०२
सडक अर्जुनी ०३ ०१
अर्जुनी मोरगाव १२ १०
एकूण ११२ ८५