लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सुखसमृद्धीचे देवता गणरायाचे सोमवारी (दि.२) जल्लोषात आगमन झाले. ढोल-ताशांच्या गजरात नाचतगात गणरायांना नेताना मोठ्या प्रमाणात भाविक व सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते दिसून येत होते. गणरायाला आपल्या घरी नेण्यासाठी सकाळपासून नागरिकांची ये-जा सुरू होती. यासाठी मूर्तीकारांकडे नागरिकांची एकच गर्दी लागून होती.राज्याचे आद्यदैवत गणरायांचा १० दिवसांचा उत्सव जिल्ह्यासह शहरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. जिल्ह्यात सुमारे ९९० सार्वजनिक तर चार हजारांवर खाजगी गणेशमूर्तींची स्थापना केली जाते. गणरायांच्या या उत्सवासाठी मागील महिनाभरापासून तयारी सुरू होती. गणेश मंडळांकडून मूर्ती व मंडप उभारण्यासाठी धावपळ सुरू होती. तर घराघरांत गणराज येणार असल्याने बालगोपालांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वाट पाहत होते.अखेर सोमवारी (दि.२) गणरायांच्या आगमनाचा दिवस उजाळला. सकाळपासूनच सायकल, दुचाकी व चारचाकींत लाडके गणराज नेताना भाविक दिसून येत होते. तर दुपारनंतर सार्वजनिक मंडळांकडून मूर्ती घेऊन जाण्यास सुरूवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात तरूण नाचत-गात व जयघोष करीत गणरायांना आपल्या स्थानी घेऊन जाताना दिसले.विशेष म्हणजे, गोंदियातील चितारओळ म्हणून प्रसिद्ध सिव्हील लाईन्स परिसरातील हनुमान चौक ते इंगळे चौक या मार्गावर मूर्तीकारांकडे मोठ्या संख्येत मूर्ती घेणाऱ्यांची गर्दी लागली होती. खासगी तसेच सार्वजनिक मूर्ती घेण्यासाठी लोकांची गर्दी लागल्याने वाहतूक सुरळीत रहावी यासाठी येथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याचे दिसले.
पोलिसांचा बंदोबस्तगणेशोत्सवादरम्यान काही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिस विभागही सज्ज आहे. पोलिस विभागाकडून प्रत्येक मंडळाला पोलीस कर्मचारी व होमगार्ड दिले जाणार आहेत. शिवाय पोलीस अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले असून तेही नजर ठेवून राहणार आहेत.