नरेश राहिले
गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील एका ३५ वर्षाच्या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यांच्या हद्दीत घडली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व संताप व्यक्त केला जात आहे. दिल्लीतील निर्भयापेक्षाही हे प्रकरण क्रुर असल्याने या प्रकरणाचा तपास एसआयटीच्या माध्यमातून केला जाणार आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी जालनाच्या राज्य राखीव दलाच्या कमांडट रागसुधा आर ह्या ८ ऑगस्ट रोजी गोंदियात दाखल झाल्या.
या सामूहिक बलात्कार प्रकरानंतर दोन्ही जिल्ह्यातील जनतेकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्य दखल राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे दिला. यासाठी राज्य राखीव दलाच्या कमांडट रागसुधा आर यांची नियुक्ती केली आहे. तसेच या तपास कार्यासाठी त्यांच्या मदतीला गोंदिया जिल्ह्यातून तीन अधिकारी व सहा पोलीस कर्मचारी असे नऊ लोक देण्यात आले. यात एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक व सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एसआयटीकडून किती कर्मचारी दाखल झाले याची माहिती देण्या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून गुप्तता पाळण्यात आली.
रागसुधा यांनी सोमवारी (दि.८) जिल्ह्यात दाखल होत तातडीने या प्रकरणाच्या तपास कार्याला सुरुवात केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची प्राथमिक माहिती आणि घटनेचे बारकावे सुध्दा त्यांनी जाणून घेतल्याची माहिती आहे. दरम्यान हे प्रकरण दाखल करण्यास उशीर करणाऱ्या कारधा येथील तीन पोलिसांना सोमवारी तातडीने निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या तपासात आणखी तथ्य पुढे येते याकडे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.