रहदारीस अडथळा : व्यावसायिकांच्या अधिपत्याला आळा घालणार कोण? लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयांसह मुख्य कुबेर नगरी असलेल्या अर्जुनी मोरगावची मुख्य बाजारपेठ रहदारी रस्त्याच्या दर्शनी भागात फूललेली दिसत आहे. सर्व मुख्य शासकीय कार्यालये असल्याने शेवटच्या टोकावरील सामान्य नागरिकांची दररोज ये-जा सुरू असते. खासगी तसेच शासकीय वाहनांचे ये-जा नित्यनेमाने सुरू आहे. शहरातील काही वर्दळीच्या रस्त्यावर लहान-मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने रहदारीस अडथळे निर्माण होताना दिसत आहे. मार्गावरील व्यावसायिकांच्या मनमौजी अधिपत्यामुळे सर्वसामान्य जनतेला मात्र कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. एसडीओ कार्यालय, तहसील कार्यालय व पंचायत समितीचे ठिकाण, रेल्वे स्थानक तसेच मुख्य बाजारपेठ असल्याने अर्जुनी मोरगाव येथे तालुक्यातील सर्व गावांतून सामान्य जनतेची सतत ये-जा सुरू असते. अर्जुनी मोरगाव येथील काही निवडक दोन-तीन रस्त्यांवर वाहनांची व ये-जा करणारांची मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून येत आहे. त्यामुळे गर्दीचे चित्र दिसत आहे. काही व्यावसायीक प्रतिष्ठाने मुख्य रस्त्यावरच असल्याने ग्राहकांची गर्दी, त्यांच्या वाहनांची गर्दी ऐन रस्त्यावर होत आहे. यातून कित्येकदा वाहतूक व्यवस्था कोलमडून पडताना दिसते. मात्र संबंधित यंत्रणा बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येते. रेल्वे फाटकापासून ते दाभना मार्ग ज्याला सिंगलटोली बायपास म्हटल्या जाते, त्या रस्त्यावर कित्येक व्यावसायिकांची भलीमोठी प्रतिष्ठाने मोठ्या प्रमाणात थाटलेली दिसून येतात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठ्या पक्क्या सिमेंट-कांक्रिटच्या मजबूत नाल्या बांधण्यात आल्या आहेत. त्या सार्वजनिक मालमत्तेवरसुद्धा काही मोठ्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करुन स्वत:चे अधिपत्य गाजविण्याची किमया केल्याचे चित्र दिसून येते. व्यावसायिकांचे साम्राज्य हटविण्यासाठी कोणीही पुढे येताना दिसत नाही. सामान्य जनतेचे अतिक्रमण काढण्यात यंत्रणा मात्र आघाडीवर असते. राज्य मार्ग असलेल्या रस्त्यावर काहींनी आपलीच मक्तेदारी चालवून स्वत:च्या उद्योगाची दुकानदारी ऐन रस्त्यावर मांडलेली दिसत आहे. दिवसाकाठी लाखोंचा व्यवसाय करणारी प्रतिष्ठाने याच मार्गावर आहेत. त्या व्यावसायिकांचे चारचाकी वाहने सामान भरुन तासनतास ऐन रस्त्यावर उभी राहतात. मार्गावरील व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानासमोर कोणत्याच प्रकारची ‘पार्किंग’ची सोय नाही, हे विशेष. ही सुविधा नसताना वर्दळीच्या रस्त्यावर खुले-आम वाहने उभी असल्याचे चित्र वारंवार दिसते. सदर मार्गावर दाभना, नवेगावबांध, महागाव, चंद्रपूरकडे जाणाऱ्या महामंडळाच्या बसेस, खासगी गाड्याची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. सामान्यांची ये-जा सुरू असल्याने व व्यावसायिकांच्या भाऊगर्दीने रहदारीस ठिकठिकाणी अडथळा निर्माण होताना दिसत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच ट्रक व चारचाकी गाडीमध्ये डॅसिंगचा प्रकार झाल्याने काही वेळ वाहतूक खोळंबली व तणावाची स्थिती निर्माण झाली होती. बघ्याची गर्दी वाढली होती. काही वेळाने पोलीस आल्याने वाहतूक सुरळीत सुरू झाली. एखाद्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यास यंत्रणा पुढे आली तर राजकीय दबावाने माघार घ्यावे लागते, अशी खास यंत्रणेकडून माहिती मिळाली. ते काही असो सामान्य जनतेच्या हितासाठी रस्त्यावरील रहदारी सुरळीत होण्यसाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे सामान्यजणांचे म्हणणे आहे.
वर्दळीच्या रस्त्यावर व्यावसायिकांचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2017 12:18 AM