गोंदिया : आजची युवा पिढी देशाचे उद्याचे भविष्य आहे. मात्र एड्समुळे बळी पडणाऱ्यांमध्ये याच युवा पिढीचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यातही एड्सचा शिरकाव आहे. अशात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी समाजात आरोग्याबाबत व्यापक जनजागृती केली पाहिजे. स्वयंसेवक म्हणून चांगली भूमिका निभावली पाहिजे. जागतिक युवा दिनाच्या पर्वावर एड्समुक्त गोंदियाचा संकल्प घ्या, असे प्रतिपादन येथील एस.एस. गर्ल्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.एन.के. बाहेकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी व गर्ल्स कॉलेजच्या संयुक्तवतीने जागतिक युवा दिनानिमित्त आयोजित एचआयव्ही व एड्स प्रतिबंधक जनजागृती पोस्टर स्पर्धेच्या उट्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन केटीएस सामान्य रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून जिल्हा एड्स नियंत्रण पथकचे जिल्हा समन्वयक संजय जेणेकर, रेड रिबन क्लबच्या समुद्देशिका अपर्णा जाधव, समुपदेशक इंदूरकर तर परीक्षक म्हणून विदर्भ विभागाच्या एनएसएसच्या विद्यापीठ प्रमुख डॉ. कविता राजाभोज प्रामुख्याने उपस्थित होत्या.
याप्रसंगी डॉ. हुबेकर यांनी, युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे आपली एड्स तपासणी करून घ्यावी. एड्सवर प्रतिबंध हाच एक उपाय असून दूषित सुया, दूषित रक्त व असुरक्षित शरीर संबंध यातून एड्स पसरतो. भारतात एड्सला बळी पडणाऱ्यांमध्ये युवा वर्गाचे प्रमाण जास्त आहे. तेव्हा काळजी घेत संयम पाळा व एड्स टाळा असा संदेश त्यांनी दिला. याप्रसंगी जेणेकर व जाधव यांनीसुद्धा आरोग्यविषयक माहिती दिली. पोस्टर स्पर्धेतील विजेत्या प्रथम ३ विद्यर्थिनींना प्रमाणपत्र, ट्रॉफी व रोख बक्षीस तसेच सहभागी प्रत्येक विद्यार्थिनीला प्रमाणपत्र देऊन डॉ. हुबेकर व डॉ. बाहेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.