लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शौचालय आणि शुद्ध पाणी या मौलिक गरजा आहेत. गावातील प्रत्येक व्यक्तीला शौचालय आणि शुद्ध पाणी मिळावे, यासाठी प्रयत्नरत राहण्याची गरज व्यक्त करून शासनाच्या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले. गोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी (दि.१५) आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीत पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, गटविकास अधिकारी झेड. डी. टेंभरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता वाघमारे उपस्थित होते. पुढे बोलताना पाटील यांनी, शासनाच्या सर्व योजना अत्यंत धोरणात्मक आहे. त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत नियोजित वेळेत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे येत्या ८ दिवसांत योजनांमधील प्रगती व्हायला हवी, ग्रामीण भागात योजना पोहोचविताना दिरंगाई करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सूतोवाचही केले. आढावा बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन आणि महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनांचा आढावा घेण्यात आला. तर भांडारकर यांनी, प्रत्येक घराला शौचालय असलेच पाहिजे. कोणतीही व्यक्ती उघड्यावर जावू नये, याची दक्षता घेण्यासोबतच नळ योजना असलेल्या गावांत प्रत्येक घरी नळ जोडणी देण्याचे आवाहन केले. आढावा बैठकीत विस्तार अधिकारी बोरकर, विस्तार अधिकारी टी.सी. हरिणखेडे, विस्तार अधिकारी एम. बी. नंदागवळी, विस्तार अधिकारी ढोंगळे व विविध योजनांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.