अर्जुनी-मोरगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी अवकाळी पावसाने आणखी संकटात पडला आहे. दोन दिवस आलेल्या अवकाळी पावसामुळे अर्जुनी-मोरगावसह तालुक्यातील केशोरी भागातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी व स्थानिक पातळीवर पंचनामे करून त्यानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी पत्राद्वारे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यातच (दि.३) सायंकाळच्या सुमारास वादळवाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याची माहिती आहे. या अवकाळी वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. तर काही झाडांना या वादळवाऱ्याचा फटका बसला आहे. तालुक्यात अवकाळी पाऊस हा आता नित्याचाच झाला आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामाच्या शेवटच्या सत्रात आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे धान पिकांचे मोठे नुकसान केले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली. त्यातच आता रब्बी हंगामातील धान पीक कापणीसाठी तयार आहेत. अशात पुन्हा मागील ३ दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच (दि.४) तालुक्यात अनेक भागात वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, वादळवाऱ्याने धान पिकाला फटका बसला आहे. तर या वाऱ्यामुळे आंब्याच्या पिकालाही मोठे नुकसान झाले आहे. एकंदरीत अवकाळी पावसाने हाती आलेले पीक पुन्हा धोक्यात आले आहे. गेल्या तीन दिवसापासून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. उभ्या पिकावर पाणी सोडण्याची वेळ त्यांच्यावर या निसर्गाच्या अनियमिततेमुळे आली आहे. यात स्वत:च लक्ष घालून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी माजी मंत्री बडोले यांनी केली आहे. या बाबतचे पत्र पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पाठविले आहे.