गोंदिया : गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गावर जमीन गेलेल्या हिरडामाली-गोरेगाव येथील ९ शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे जमिनीचा योग्य मोबदला, तसेच जबलपूर-गोंदिया-बल्लारशा या मार्गावर आरओआर प्रकल्पात घरे गेलेल्या २९ जणांचे प्रधानमंत्री घरकुल योजनेतून पुनर्वसन करण्याचे निर्देश खा. सुनील मेंढे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.९) घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत त्यांनी गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गावरील हिरडामाली-गोरेगाव येथील ९ शेतकऱ्यांनी विद्युतीकरण प्रकल्प थांबविल्याने सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांचे नुकसान होत आहे. अशात रेल्वे विभागाने शेतजमीन अधिग्रहित केल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून बाजारभावाप्रमाणे योग्य मोबदला देण्याचे निर्देश दिले, तसेच नगर परिषद हद्दीतील २९ नागरिकांची घरे आरओआर प्रकल्पामुळे बाधित होणार आहेत. सामान्य नागरिक त्यामुळे बेघर झाले असते. आरओआर प्रकल्प पूर्णत्वास गेल्यावर जबलपूर-गोंदिया-बल्लारशा या मार्गावरील रेल्वे सेवा सुरळीत आणि वेगवान होण्यास मदत होणार आहे. यामुळे त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सर्व २९ प्रकल्प बाधितांचे प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्यासाठी योग्य ती पावले त्वरित उचलण्याचे निर्देश दिले. याशिवाय, गोंदिया शहरातील रेल्वेपूल क्षतिग्रस्त झाला असून, नवीन पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने सीआरएफ फंडातून या बांधकामासाठी मंजुरी मिळाली असून, लवकरच ते काम सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी बिरसी विमानतळावरील प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. बैठकीला भाजप संघटनमंत्री बाळा अंजनकर, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी, युवा मोर्चा अध्यक्ष ओम कटरे, गोरेगावचे माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार, गजेंद्र फुंडे, भाजप उपाध्यक्ष रेखलाल टेंभरे, राजेश चतुर, हर्ष मोदी, गुड्डू कार्डा, कार्यकारी अभियंता पांडे, रेल्वे विभागाचे नागराज उडोला, मनीष शर्मा, गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण, वीज विभागाचे अधिकारी उपस्थित होते.