लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : अध्यापन तसेच शिक्षणासंबंधी विविध समस्या व अडचणी असून सुध्दा विद्यार्थी व पालक प्रखरपणे बोलू शकत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी व पालकांच्या समस्या सुटत नाही. अशात अनेकवेळा शैक्षणिक नुकसान सुद्धा होत असते. या बाबी लक्षात घेता राज्य शासनाने प्रत्येक शाळेत विद्यार्थी व पालकांसाठी तक्रारपेटी लावण्याचा निर्णय नुकताच घेतला असून शिक्षण विभागाने राज्यातील प्रत्येक शाळांना आदेश निर्गमीत केले आहे. या आदेशान्वये प्रत्येक शाळेने आपल्या दर्शनीयस्थळी तक्रार पेटी लावणे बंधनकारक राहील. शासनाचा हा निर्णय सर्व प्रकारच्या शाळांना अंमलात आणावा लागेल यात शासकीय निमशासकीय शाळा, जि.प.शाळा, नगर परिषद शाळा खासगी अनुदानित, विना अनुदानित शाळा, मराठी शाळा, इंग्रजी शाळा, कान्व्हेंट शाळा, स्वयं अर्थसहाय शाळा आश्रम शाळा, व्यवसायीक अभ्यासक्रमाच्या शाळा तसेच महाविद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयात सुध्दा अशा तक्रारपेट्या लावण्यात येतील. तक्रारपेटीमध्ये विद्यार्थी आपल्या शैक्षणिक समस्या, शाळेत मिळणाऱ्या भौतिक सुविधांबद्दल असलेल्या समस्या लिहून टाकतील. त्याचबरोबर पालकवर्गही ज्या बाबतीत असमाधानी असेल त्या समस्या लिहून टाकतील. सदर तक्रारपेटी आठवडा भर पालक व विद्यार्थी दोन्हीसाठी खुली राहणार असून आठवड्याच्या शेवटी उघडण्यात येईल व त्यातील तक्रारींची नोंद घेण्यात येईल. तक्रारपेटीत असलेल्या समस्यांचे निराकरण करणे शाळा व्यवस्थापनाला बंधनकारक राहील. तक्रारपेटी उघडताना तक्रारीची योग्य दखल घ्यावी यासाठी त्यावेळी शाळा समितीचे पदाधिकारी, पालक तसेच अधिकारी सुद्धा उपस्थित राहू शकतील. ज्या शाळांमध्ये तक्रारीची दखल घेतली जाणार नाही त्या शाळांची तक्रार शिक्षण विभागाकडे केली जाईल.
प्रत्येक शाळेत लागणार तक्रारपेटी
By admin | Published: May 08, 2017 12:50 AM