तिरोडा : धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा २ चे काम प्रगतिपथावर असून ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. ही योजना लवकरात लवकर सुरू होऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा लवकरात लवकर व्हावा व २१,००० हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन शेतकरी दुबार पीक घेऊन समृद्ध होईल. त्याकरिता लवकरात लवकर काम करण्यात यावे, असे निर्देश आमदार विजय रहांगडाले यांनी दिले.
तिरोडा तालुक्यातील विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीत योजनेकरिता जमीन संपादन केलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला देणे, अदानी पॉवर लिमिटेड येथे रोजगाराकरिता स्थानिकांना प्राधान्य देणे, कस्टम मिलिंगचे साठवण तालुक्याच्या ठिकाणी ठेवणे जेणेकरून शासनाचा पैसा व वेळेची बचत होईल, शेतकऱ्यांच्या प्रलंबित वीज जोडण्या लवकर लावणे, शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान खरेदीची गती वाढविणे. आवश्यकता भासल्यास धान खरेदीची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढविणे, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर असलेल्या शहरी भागातील अतिक्रमणधारकांचे पट्टे नियमाकूल करणे, निमगाव (आंबेनाला) प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे, या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले, सुभाष चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पानसरे, जिल्हा पुरवठा अधिकारी वानखेडे, तिरोडा येथील उपविभागीय अधिकारी अजय नस्ते, मध्यम प्रकल्प कार्य.अभियंता कापसे, जिल्हा प्रशासन अधिकारी करण चव्हाण, उपअभियंता पंकज गेडाम, माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार, मुख्याधिकारी हर्षला राणे, जिल्हा पणन अधिकारी बिसेन व सर्व यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.