सडक-अर्जुनी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या (मुंबई) आदेशान्वये दिवाणी व फौजदारी न्यायालयात १ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, भांडणापेक्षा समझोता बरा, त्यातच खरा आनंद असल्याने नागरिकांनी या लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष, न्यायाधीश विक्रम आव्हाड यांनी केले आहे.
राष्ट्रीय लोकन्यायालयात प्रलंबित असलेली सर्व दिवाणी स्वरूपाची प्रकरणे जसे वाटपाचा दावा, रस्त्याचा दावा, कब्जा व मालकी हक्काचा दावा, मनाई हुकुमाचा दावा, अतिक्रमणाचा दावा, शेतजमिनीचा दिवाणी वाद तसेच सर्व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, कौटुंबीक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५अंतर्गत येणारे अर्ज, परक्राम्य संलेख अधिनियम कलम १३८ अन्वये दाखल प्रकरण, उदरनिर्वाह भत्ता अर्ज, तसेच दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. ज्या नागरिकांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असतील त्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपली प्रकरणे आपापसांत तडजोड करून निकाली काढावीत. याकरिता तालुका विधी सेवा समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे न्या. आव्हाड यांनी कळविले आहे.