लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने उंचावित आहे. कोरोना बाधितांची संख्या तीन आकड्यात वाढत असल्याने जिल्हावासीयांच्या काळजीत निश्चितच भर पडली आहे. मागील आठ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात ८६१ कोरोना बाधितांची भर पडली तर ९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून ५२९ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. आरोग्य विभागाकडून दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज वर्तविला जात होता. तर दिवाळीपूर्वी कोरोना बाधितांच्या चाचण्या कमी झाल्याने रुग्ण संख्येला सुध्दा काही प्रमाणात ब्रेक लागल्याचे चित्र होते. ऑक्टोबर महिन्यात रुग्ण संख्या बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातून कोरोनाचा परतीचा प्रवास सुरु झाल्याची स्थिती दिसून येत होती. मात्र दिवाळीनंतर कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. १७ ते २४ नोव्हेंबर जिल्ह्यात एकूण ८६१ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर ९ बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. उपचार घेत असलेल्या ५२९ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. तर १ ते २४ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येवर नजर टाकल्यास हा महिना जिल्हावासीयांसाठी चिंता वाढविणाराच ठरला आहे. या कालावधीत १८५२ कोरोना बाधित रुग्णांची नाेंद झाली तर २२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. १५३४ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्के असल्याने ही थोडी दिलासादायक बाब आहे. कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. शिक्षण विभागाची वाढली चिंता २३ नाेव्हेंबरपासून जिल्ह्यातील ९ वी ते १२ पर्यंतचे वर्ग सुरु झाले असून शिक्षकांना शाळेत रूजू होण्यापूर्वी कोरोनाची चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास १५०० वर शिक्षकांची कोरोना चाचणी झाली असून १२५ शिक्षक कोरोना बाधित आढळले आहे. तर अजुन बऱ्याच शिक्षकांच्या चाचणीचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या चिंतेत सुध्दा भर पडली आहे. मास्कचा वापर, काळजी घेणे हाच रामबाण उपायकोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढत असून मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याकडे नागरिकांचे काहीसे दुर्लक्ष झाले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करणे पुन्हा महागात पडू शकते. त्यामुळे नियमित मास्कचा वापर, सॅनिटायझेशन आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन हेच कोरोनावरील रामबाण उपाय आहे.