गोंदिया : गोंदिया शहराची अस्वच्छ शहराची प्रतिमा पुसून काढून सर्वांना स्वच्छतेचे महत्व कळण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘गंदगी हटाओ’ अभियानाची स्वातंत्र्यदिनी बाईक रॅली काढून सांगण्यात आली. १३ दिवस चाललेल्या या अभियानात अविरतपणे शहराच्या सर्व भागातील कचरा साफ करण्यात आला.सावजी शिक्षण संस्थेचे संचालक सुरेश चौरागडे (गुरूजी) यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या या अभियानात विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभागी होत या अभियानाला प्रोत्साहन दिले. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक करून स्वच्छतेची सवय लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.समारोपीय कार्यक्रम कुडवा येथील गाडगे महाराज मंदिरात करण्यात आला. या कार्यक्रमात विदर्भवादी नेते संतोष पांडे, लाडे गुरूजी, रेखादेवी चौरागडे, प्राचार्य प्रमोद चौरागडे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना चौरागडे गुरूजी यांनी घाणीचे दुष्परिणाम सांगून सर्व आजारांचे मूळ अस्वच्छतेत असते. त्यामुळे जोपर्यंत आपण या घाणीला आपल्यापासून दूर करणार नाही तोपर्यंत रोगांच्या संगतीने राहावे लागेल. शहरातील गंदगी दूर करण्याची सुरूवात मी केलेली आहे. परंतू हे काम प्रत्येकाने नियमितपणे सुरू ठेवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी संतोष पांडे यांनी अशा समाजोपयोगी कामात शासनाच्या माध्यमातून किंवा स्थानिक संस्थांनी मदतीसाठी पुढे येऊ नये याबद्दल खेद व्यक्त केला. परंतु नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. यानंतर हिरवी झेंडी दाखवून बाईक रॅलीला सुरूवात करण्यात आली. शहराच्या प्रमुख मार्गाने स्वच्छतेबद्दल नारे लावत आणि भारत मातेचा जयजयकार करीत रॅलीचा कुडवा येथे समारोप झाला.
‘गंदगी हटाओ’ अभियानाची सांगता
By admin | Published: August 17, 2014 11:16 PM