लोहारा : येथील ग्रामपंचायतीमधील शिपाई पदासाठी २९ जुलै लेखी परीक्षा घेण्यात आली. मात्र, त्याचा निकाल जाहीर करताच या पदासाठी परीक्षेला बसलेल्या इतर परीक्षार्थींना घोळ झाला असल्याचे समजताच त्यांच्यातून रोष व्यक्त होत आहे. अशात त्यांनी पुन्हा परीक्षा घेण्यासाठी सरपंचांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
येथील ग्रामपंचायतीमध्ये शिपाई पदाची रिक्त जागा भरण्यासाठी २९ जुलै रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी पात्रता १०वी उत्तीर्ण होती. परीक्षेत २१ उमेदवार सहभागी झाले व परीक्षेत २५ प्रश्न विचारण्यात आले होते. प्रतिप्रश्न दोन गुण याप्रमाणे एकूण ५० गुणांची परीक्षा होती. परंतु निवड करण्यात आलेल्या संदीप जागेश्वर लटये या उमेदवाराला ५० पैकी ४४ गुण मिळाले. हा उमेदवार बारावी उत्तीर्ण आहे. त्याने १०-१५ मिनिटांमध्ये सर्व प्रश्न सोडविले आहे. इतर परीक्षार्थ्यांनी लटये यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व प्रश्न अंदाजे सोडविल्याची कबुली दिली आहे. अशात या उमेदवाराला एवढे गुण मिळाले कसे, असा आरोप इतर परीक्षार्थींनी केला आहे. पात्र उमेदवार इतके गुण घेऊ शकत नाही. त्यामुळे परीक्षेत झालेला घोळ बघता पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी राकेश सोनवणे, हरिश उके, राहुल मेश्राम आणि इतर उमेदवारांनी सरपंचांना निवेदन देऊन केली आहे.
------------------------
उमेदवारांचे निवेदन प्राप्त झाले असून, ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत चर्चा करून उमेदवारांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार.
-पन्नालाल चौधरी, (सरपंच)
----------------
देवरी पंचायत समितीच्या परीक्षकांनी परीक्षा घेतली असून, ती पारदर्शक होती. त्यांनी घेतलेल्या शिपाई परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. कागदपत्रांची तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
जी. एस. मेश्राम, ग्रामसेवक