लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने राहुल गांधी गांधी जन्मदिवस संकल्प दिन म्हणून साजरा करीत या दिनाचे निमित्त साधून शेतकरी समस्या, वाढती महागाई व बेरोजगारी विरोधात शनिवारी (दि.१९) जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानाना पाठविण्यात आले. मागील दीड वर्षापासून देश कोरोना महामारीचा सामना करीत आहे. या काळात शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडल्याने लाखो लोक बेरोजगार झाले. दिशाहीन नेतृत्वामुळे देश एका अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहे. कोरोनामुळे मोठी हानी होऊ शकते, असा इशारा देत वेळीच उपाययोजना करण्याच्या सूचना राहुल गांधींनी पंतप्रधानांना केल्यानंतरसुध्दा हा जबाबदारीचा सल्ला न ऐकता देशाला हेकेखोरपणाने मरणाच्या खायीत लोटण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केल्याचा आरोप आंदोलनातून कॉंग्रेसने केला. अशात आज देशाला वाचवायचे असेल तर राहुल गांधी यांच्या विचारांची आणि दूरदृष्टीपणाची गरज आहे. राहुल गांधी यांच्याशिवाय आता देशाला पर्याय नाही हाच आपला संकल्प घेऊन काँग्रेस कमिटीने त्यांचा वाढदिवस हा संकल्प दिन म्हणून साजरा करीत हे आंदोलन केले. याप्रसंगी शेतकरी समस्या, वाढती महागाई व बेरोजगारी तसेच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व तीन काळे कृषी कायदे रद्द करा या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाध्यक्ष डॉ.एन.डी. किरसान यांच्या नेतृत्वात आयोजित या आंदोलनात प्रदेश सचिव विनोद जैन, अमर वराडे, महिला काँग्रेस अध्यक्ष उषा सहारे, युवक काँग्रेस अध्यक्ष अलोक मोहंती, किसान काँग्रेस अध्यक्ष जितेश राणे, सेवादल अध्यक्ष पन्नालाल शहारे, ओबीसी सेल अध्यक्ष जितेंद्र कटरे, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष परवेज बेग, शहर अध्यक्ष जहीर अहमद, तालुकाध्यक्ष सूर्यप्रकाश भगत, रमेश अंबुले, रमेश लिल्हारे, गोपाल कापसे, नीलम हलमारे, शैलेश जायस्वाल, पवन नागदेवे, हंसराज गयगये, अजय रहांगडाले, राजीव ठकरेले, कीर्तीकुमार येरणे, मजहर खान, वंदना काळे, वनिता चिचाम, अनिता मुनेश्वर, भुमेश्वरी रहांगडाले, ममता पाऊलझगडे, लता इळपाचे, सरिता अंबुले, पुष्पा खोटेले, गंगाराम बावनकर, दलेश नागदवने, रवी क्षीरसागर यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सेल्फी विथ सिलिंडर व बेरोजगारांची मुलाखत या आंदोलनांतर्गत आंदोलकांनी वाढत्या खाद्यतेल, पेट्रोल-डिझेल किमतीबाबत रोष व्यक्त करीत जसानी गॅस एजन्सीसमोर स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर दरवाढीबद्दल सिलिंडरच्या छायाचित्रासोबत महिलांनी सेल्फी काढून घोषणाबाजी करीत भाववाढीचा निषेध केला. तर युवक काँग्रेसने उपविभागीय कार्यालयासमोर बेरोजगारी आंदोलन केले. तेथे ‘मेक इन इंडिया प्रस्तुत मोदी बेरोजगार मेळावा भरविण्यात आला व ‘इंटरव्ह्यू फॉर बेरोजगार’ असा बॅनर लावून बेरोजगार युवकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.