देशातील जनतेला भरमसाठ खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपच्या हुकुमशाही राजवटीमुळे देशाची आर्थिक स्थिती पूर्णत: ढासळली आहे. जगाचा पोशिंदा गेल्या ११ महिन्यांपासून दिल्लीत ठाण मांडून बसलेला आहे, तरीही या जुलमी सरकारला त्यांची कीव येत नाही. उलट त्यांचा क्रूर पध्दतीने छळ केला जात आहे. केंद्रातील मोदी सरकारने या देशातील सर्व सरकारी यंत्रणा ताब्यात घेऊन देश बर्बाद करण्याचा घाट घातला आहे. देशातील सर्व सार्वजनिक उपक्रम जसे रेल्वे, बँका, विमानसेवा, रस्ते, विमा कंपन्या, सार्वजनिक उद्योग, दूरसंचार आणि बंदरे अशी एक - एक करुन विकत आहे. अदानीच्या मालकीच्या गुजरातमधील मुंद्रा बंदरातून २१ हजार कोटींच्या ड्रग्जची तस्करी सापडली आहे. तरुणांना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ, असे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारने असलेल्याही नोकऱ्या संपुष्टात आणल्या आहेत. या अशा मार्गाने देशातल्या तरुणांना बेरोजगार करुन त्यांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न मोदींच्या कटकारस्थानी सरकारकडून सातत्याने सुरु आहेत. भाजप सरकारविरोधात देशातील सर्व शेतकरी संघटना व डाव्या आघाड्यांनी तीव्र आवाज उठवला असून, सोमवारी (दि. २७) भारत बंदचे आवाहन केले आहे. या भारत बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. एन. डी. किरसान, आमदार सहेसराम कोरोटे, प्रदेश सचिव अमर वराडे व पी. जी. कटरे, माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी केले आहे.
कॉँग्रेसचा भारत बंद आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:30 AM