गोंदिया : जिल्ह्यात आगामी हाेऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या धर्तीवर काँग्रेस पक्षाने आपले मिशन सुरुवात केली आहे. याच मिशनची सुरुवात त्यांनी तिरोडा विधानसभा क्षेत्रापासून केली आहे. शनिवारी (दि.१९) या मिशनचा प्रचाराचा नारळ जिल्हा जनक्रांती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्या प्रवेशाने केला. दिलीप बन्सोड यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेलासुद्धा आता विराम लागला आहे.
माजी आ. दिलीप बन्सोड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शनिवारी मुंबई येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री तथा बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री माणिकराव ठाकरे आदी उपस्थित होते. दिलीप बन्सोड हे काँग्रेस पक्षात लवकरच प्रवेश करणार, हे जवळपास निश्चित झाले होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नुकतेच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले, तेव्हा त्यांनी बन्सोड यांच्याशी चर्चा केली होती. तर बन्सोड कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असा निरोप दिला होता. त्यानंतर १९ जूनचा मुहूर्त साधत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय आधीच जाहीर केला आहे. त्यातच गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूकसुद्धा लवकरच होऊ घातली असून, यासाठी त्यांनी आता पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीतसुद्धा लवकरच नवे बदल दिसतील, असे त्यांनी सांगितले होते. त्यातच माजी आ. दिलीप बन्सोड यांना काँग्रेस पक्षात आणून तिरोडा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. बन्सोड हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते; मात्र मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी करीत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला. त्यानंतर त्यांनी जनक्रांती विकास आघाडीची स्थापना करून तिरोडा विधानसभा क्षेत्रात माेर्चेबांधणी व जनसंपर्क सुरूच ठेवला होता. त्यातच मागील महिनाभरापासून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा सुरू होती. त्यालासुद्धा पूृर्णविराम लागला आहे.
.......
काँग्रेसचा गड मजबूत करण्याचा प्रयत्न
तिरोडा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी आणि भाजपची पकड मजबूत आहे. तर त्या तुलनेत काँग्रेस पक्ष कमजोर होता; मात्र बन्सोड यांची एण्ट्री करून आता काँग्रेसने या क्षेत्रावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच विधानसभा निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढविल्यास बन्सोड यांना याच क्षेत्रातून काँग्रेसकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. याच अटीवर त्यांनीसुद्धा पक्षात प्रवेश केल्याचे बोलल्या जाते.
..........
एक माजी आमदार आणि जि.प.सदस्य मार्गावर
माजी आ. दिलीप बन्सोड यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आता जिल्ह्यातील एक माजी आमदार आणि काही जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस पक्षात लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच जिल्ह्यातील राजकारण तापल्याचे चित्र आहे.