गोंदिया : जिल्ह्यातील चार नगर पंचायतींमध्ये सत्ता स्थापनेसाठी झालेल्या समीकरणाची झलक सोमवारी अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल केल्यानंतर पहायला मिळाली. यात अर्जुनी मोरगाव आणि गोरेगाव येथे अध्यक्षपद काँग्रेसकडे जाणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे, तर देवरी आणि सडक अर्जुनीत राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भाजपला चारही ठिकाणी सत्तेपासून दूर राहावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी भाजपने प्रयत्न सोडलेले नसून ऐनवेळी समीकरणे बदलण्याची शक्यताही नाकारता येत नाही.अर्जुनी अध्यक्ष काँग्रेसचा उपाध्यक्षपद गुलदस्त्यातअर्जुनी-मोरगाव : नगर पंचायत अध्यक्षपदासाठी सोमवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या वेळेपर्यंत काँग्रेसच्या पौर्णिमा कृष्णा शहारे यांचे एकमेव नामांकन दाखल झाले. त्यामुळे अध्यक्षपदी निवड होणे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र उपाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार हे गुलदस्त्यात आहे.येथील नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या प्रवर्गातील महिला उमेदवार केवळ काँग्रेसजवळच असल्याने काँग्रेसचा नगराध्यक्ष होणार हे निश्चित होते. इतर राजकीय पक्षांजवळ या प्रवर्गातील महिला उमेदवार नसल्याने नामांकनच दाखल झाले नाही. आता केवळ नगराध्यक्षाचे नाव घोषित होण्याची औपचारिकता बाकी आहे. उपाध्यक्षपदासाठी पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काँग्रेस व भाजपचे प्रत्येकी सहा उमेदवार निवडून आले. उपाध्यक्षाची दारोमदार ही राष्ट्रवादी, अपक्ष व शिवसेना पक्षातर्फे निवडून आलेल्या विजयी उमेदवारांवर अवलंबून आहे. काँग्रेसने विजयी उमेदवारांसाठी सहलीचे आयोजन केले आहे. त्यांनी उमेदवारांची जुळवाजुळव केली होती. मात्र बहुमतासाठी आवश्यक असलेल्या उमेदवारांपैकी दोन उमेदवार सहलीत सहभागी झाले नाही. त्यामुळे संभ्रम कायम आहे. सद्यस्थितीत काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांचे उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती आपापल्या पक्षाचे बनविण्याची समसमान संधी आहे. या संधीचा नेमका लाभ कोणता राजकीय पक्ष घेतो याकडे नगरवासीयांचे लक्ष लागले आहे.गोरेगावातही काँग्रेसकडे अध्यक्षपद गोरेगाव : अपक्ष व काँग्रेस यांच्या समर्थनामुळे काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे. अपक्ष ४ व काँग्रेस ५ या संख्याबळाच्या आधारावर काँग्रेस सत्तेत येण्याची चिन्हे आहेत.सोमवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने सीमा राहुल कटरे व भाजपाच्या वतीने उषा मोरेश्वर रहांगडाले यांनी नगराध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल केले आहे. काँग्रेसकडे अपक्ष मिळून ९ नगरसेवकांचे पाठबळ आहे, तर भाजपाकडे सात नगरसेवक आहेत. सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला ९ नगरसेवक पाहिजे. मात्र ते समीकरण भाजपाकडे नसल्यामुळे काँग्रेस पक्ष सत्ता काबीज करेल असे भाकीत वर्तविले जात आहे. विशेष म्हणजे भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असला तरी भाजपाला सत्तेपासून रोखण्यात काँग्रेसने यश मिळविल्याचे बोलले जात आहे. भाजपाला अंतर्गत कलह भोवला अशी चर्चाही यानिमित्ताने पुढे येत आहे.सडक-अर्जुनीत तीनही पक्षांचे अर्ज सडक-अर्जुनी : नगर पंचायत अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव असून १७ पैकी ४ सदस्य अनुसूचित जातीचे आहेत. त्यापैकी काँग्रेस पक्षाकडून अभय रामलाल राऊत, भाजपकडून गिता राजेश शहारे आणि राष्ट्रवादीकडून रिता अजय लांजेवार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यापैकी राष्ट्रवादीचे पाच आणि बाहुबली पॅनलचे चार अशी आगाडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे झाल्यास रिता लांजेवार यांना अध्यक्षपदाची संधी मिळू शकते.देवरीत राष्ट्रवादी की भाजपला संधी?देवरी : नगर पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुमन बिसेन यांनी तर भाजपकडून कांता सुवनरलाल भेलावे यांनी सोमवारी नामांकन दाखल केले. दोनच पक्षांकडून नामांकन दाखल झाल्यामुळे जोड-तोडच्या राजकारणात कोण कोणावर बाजी मारणार यावर कोणाची सत्ता स्थापन होईल हे अवलंबून आहे.राष्ट्रवादी काँग्रेसला एका अपक्ष उमेदवाराची साथ मिळाली तर त्यांची सत्ता स्थापन होऊ शकते. केवळ एका सदस्याची गरज असल्यामुळे सभापतीपद किंवा न.पं. उपाध्यक्षपद देऊन एका उमेदवाराला आपल्याकडे खेचणे राष्ट्रवादी काँग्रेससाठी कठीण नाही. मात्र कोण कोणाला साथ देणार हे दि.२७ ला स्पष्ट होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
काँग्रेस-राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद?
By admin | Published: November 24, 2015 1:59 AM