तिरोडा : केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरची सातत्याने दरवाढ केली जात आहे. परिणामी महागाई चारपट वाढली असून, शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. याचा निषेध नोंदवीत तिरोडा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी (दि.११) सायकल रॅली काढून इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला. माजी आ. दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या रॅलीत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
स्थानिक बसस्थानक परिसरात सायकल रॅलीला सुरुवात झाली. यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी सायकलनेच तहसील कार्यालयापर्यंत पोहोचत इंधन दरवाढीविरोधात नारेबाजी केली, तसेच केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला. यावेळी माजी आ. दिलीप बन्सोड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीदारांना दिले. यावेळी दिलेल्या निवेदनातून इंधन दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी, खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती करण्यात याव्यात, रासायनिक खताच्या किमती कमी करण्यात याव्यात, बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा, यासह अन्य मागण्यांचा समावेश होता. आंदोलनात तालुकाध्यक्ष ठमेंद्रसिंग चव्हाण, राधेलाल पटले, प्रदीप पटले, घनश्याम चैनानी, सोनू बिसेन, हितेंद्र जांभूळकर, सुशील कोटांगले, अमीन शेख, बाबूलाल मेश्राम, जितेंद्र बन्सोड, वीरचंद नागपुरे, ग्यानीराम बाबरे, अजय वैद्य, माणिक झंझाड, इकबाल शेख, दिलीप ढाले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.