वेळ पडल्यास विरोधात बसा, पण भाजप.. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला सदस्यांना कानमंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2022 02:10 PM2022-05-03T14:10:17+5:302022-05-03T14:26:47+5:30
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी जिल्ह्याचा दौरा करून जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची बोदलकसा येथे बैठक घेऊन त्यांना कानमंत्र दिला.
गोंदिया :जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक १० मे रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच अनुषंगाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी (दि.२) जिल्ह्याचा दौरा करून जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची बोदलकसा येथे बैठक घेऊन त्यांना कानमंत्र दिला. काहीही झाले तरी एकही सदस्य भाजपकडे जाऊ नये, वेळ पडल्यास विरोधात बसू; पण महाविकास आघाडीचा धर्म मोडायचा नाही, अशा स्पष्ट सूचना त्यांनी काँग्रेसच्या सदस्यांना केल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषदेतील एकूण पक्षीय बलाबल पाहिल्यास भाजप २६, काँग्रेस १३, राष्ट्रवादी ८, चाबी ४, अपक्ष २, असे एकूण ५३ सदस्य आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी २७ हा आकडा पार पाडण्याची गरज आहे. अपक्ष सदस्यांच्या मदतीने भाजप हा आकडा सहज पार पाडू शकते, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष सदस्य एकत्रित आल्यास त्यांनासुद्धा सत्ता स्थापन करता येऊ शकते; पण मागील काही जिल्हा परिषद निवडणुकांचा अनुभव पाहता तसे होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी जिल्हा परिषद निवडणुकीबाबत स्पष्ट भूमिका जाहीर केली. सत्ता स्थापन करू तर महाविकास आघाडीसह, नाही तर विरोधात बसू, हाच फॉर्म्युला भंडारा जिल्हा परिषदेसाठी लागू राहील, हेदेखील स्पष्ट केले. त्यामुळे भंडारा जि.प.वर महाविकास आघाडीची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेतसुद्धा अपक्ष सदस्यांच्या मदतीने महाविकास आघाडीची सत्ता स्थापन व्हावी यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड आणि इतर नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह चर्चा केल्याचे बोलले जाते. त्यामुळे यावरील निर्णयाचा चेंडू आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर्टात गेला आहे. एकंदरीत गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीला घेऊन राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे.
अपक्षही अनुकूल असल्याची चर्चा
गोंदिया जिल्हा परिषदेचा आजवरचा इतिहास पाहिल्यास सर्वांत मोठ्या पक्षाला नेहमीच सत्तेपासून दूर राहावे लागले आहे, तर या वेळेच्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल पाहता अपक्षांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याची अनुकूलता दर्शविल्यास भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागू शकते. यावर अपक्ष सदस्य अनुकूल असल्याची चर्चा आहे; पण नेमके चित्र १० मे रोजीच स्पष्ट होईल.
भाजप म्हणते..
जिल्हा परिषदेत अपक्ष सदस्यांच्या मदतीने भाजपची सत्ता स्थापन होईल. सध्या सुरू असलेल्या चर्चा केवळ जर तरच्या असून, अंतिम चित्र हे १० मे रोजी स्पष्ट होईलच. अध्यक्षपदाच्या नावावर ७ मेच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे, त्यानंतर जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचे चित्र स्पष्ट होईल, असे जिल्ह्यातील भाजप नेते सांगत आहेत.
अपक्ष सदस्यांच्या मनात दडलेय काय
जिल्हा परिषदेत सत्ता कुणाची याचे सर्व समीकरण हे अपक्ष सदस्यांवर अवलंबून आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी या सदस्यांना पदाची ऑफर दिली जाण्याची शक्यता आहे; पण या अपक्ष सदस्यांचा कल नेमका कुणाच्या बाजूने आहे, त्यांची इच्छा नेमकी काय, हे मात्र त्यांनी अद्यापही बोलून दाखविलेले नाही. त्यामुळे त्यांच्या मनात नेमके काय दडलेय हे कळण्यास मार्ग नाही.
पंचायत समितीत भाजप सरस
जिल्ह्यातील आठपैकी पाच पंचायत समितींवर भाजपची सत्ता स्थापन होण्याची शक्यता पक्षीय बलाबलावरून दिसून येते, तर सालेकसा पंचायत समितीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत असल्याने येथे काँग्रेसची सत्ता स्थापन होईल; पण गोंदिया पंचायत समितीत सत्तेचे सर्व समीकरण चाबीच्या भूमिकेवर अवलंबून आहे. त्यामुळे पंचायत समितीचे अंतिम चित्र ५ मे रोजीच स्पष्ट होईल.