नेत्यांची मतदारांसमोर माघार : कार्यकर्त्यांच्या फळीचा अभावअमरचंद ठवरे बोंडगावदेवीनुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची वाताहत झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचा यावेळी जनाधार वाढवून जिल्हा परिषदेच्या दोन व पंचायत समितीच्या चार जागा काबिज करून तालुक्यात आपले मताधिक्य वाढविले आहे. त्या मानाने स्वनामधन्य नेत्यांच्या फाजील अतिआत्मविश्वासाने काँग्रेसचे नुकसान झाल्याचे स्पष्ट आहे.अर्जुनी-मोरगाव तालुका एकेकाळी काँग्रेसमय होता. मात्र या वेळी भाजपमध्ये अंतर्गत कलह कमालीचा खदखदत असतानाही काँग्रेसच्या दुबळ्या नेतृत्वामुुळे काँग्रेसला हवा तसा लाभ घेता आला नाही. गावपातळीवर तळागाळातल्या कार्यकर्त्यांना मिळालेली सारिपाटाची संधी तालुक्यातील नेत्यांच्या दुबळ्या नेतृत्वामुळे हुकली. वरिष्ठांच्या नजरेसमोर हुजरेगिरी करणारे व आमदारकीच्या उमेदवारीचे बाशिंग बांधून असलेले नेते तालुक्यातील मतदारांपर्यंत पोहचले नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना स्वत:चा प्रचार स्वत:च करण्याची नामुश्की आली. तालुक्यात काँग्रेसचा जनाधार असला तरी कार्यकर्त्यांची फळी मात्र विखूरलेली दिसत आहे. काही मोजक्या जनाधार नसलेल्या नेत्यांवर भार देवून वरिष्ठ नेते आपली जबाबदारी झटकत असतील तर ईलाज नाही. निवडणुकीदरम्यान काही उमेदवारांचे मनोधैर्य कमी करण्याच्या प्रयत्नात नेत्यांनी कसर सोडलेली नाही, असेही प्रसंग प्रचारावेळी घडले. तालुक्यातील काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माहुरकुडा सोडला तर तालुक्यातील नेत्यांनी मेहनत घेतली नाही, असे बोलले जाते. संघटनेचा अभाव गावागावात आढळून येत आहे. काँग्रेस नेत्यांनी झालेल्या जि.प. व पं.स. विजयावरून आत्मपरीक्षण करून चिंतन करण्याची वेळ गरज आहे. सात जि.प. जागांपैकी फक्त एका माहुकुडा जि.प. जागेवर विजय मिळविण्याची संधी काँग्रेसला एका अपक्ष उमेदवारामुळे चालून आली, हे विसरता येणार नाही. कार्यकर्त्यांची फळी दिसली नाही. तालुक्याचे नेते घरी बसून आकडेमोड करण्यातच गाफील राहिले. उमेदवारांची बाजू ऐकूण घेण्यास त्यांना स्वारस्य दिसलेच नाही. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांच्या रांगेत बसण्यासाठी ओढताण करणारे तालुक्याचे मातब्बर नेते सामान्य कार्यकर्त्यांच्या विजयासाठी धडपडताना दिसले नाही. पर्यायाने काँग्रेसला आज तालुक्यात असे चित्र पहायला मिळाले. पक्षश्रेष्ठींनी स्वनामधन्य नेत्यांना मतदारांपर्यंत जाण्यासाठी तत्पर करावे. काँग्रेसला नवसंजीवनीसाठी तालुक्यात काँग्रेसने लोककार्यकर्त्यांची फळी निर्माण करून संघटन वाढविण्यास भर देणे गरजेचे आहे. येणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीत अशी चूक होणार नाही, याची खबरदारी घेणेसुद्धा गरजेचे आहे.पक्षविरोधी काम करणाऱ्यांना चपराकबोंडगावदेवी जि.प. क्षेत्रात निमगाव व बोंडगावदेवी पं.स. क्षेत्राचा समावेश आहे. सर्वच राजकीय पक्षांनी क्षेत्रातील एकाच समुदायाचे तिन्ही उमेदवार रिंगणार उतरविले होते. कमल पाऊलझगडे यांना भाजपची उमेदवारी मिळाल्याने भाजपमध्ये दुकळी निर्माण होवून असंतुष्ट कार्यकर्त्यांनी पाडा-पाडीचे राजकारण केले. बोंडगावदेवी पं.स. क्षेत्रात कमल पाऊलझगडे यांना फटका बसला तरी निमगाव पं.स. क्षेत्रात अरविंद शिवणकर यांच्या उमेदवारीमुळे कमळाला विजयी होण्याचे सौभाग्य मिळाले. निवडणुकीदरम्यान भाजप पराभवाची भविष्यवानी भाजपच्याच असंतुष्ट कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. त्यांच्या पराभवासाठी विविध मार्गाने शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. परंतु अखेर मतदारांनी भाजपाला जवळ करून तिन्ही उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. बोंडगावदेवी जि.प. क्षेत्रातून भाजपचे कमल पाऊलझगडे, बोंडगावदेवी पं.स. क्षेत्रातून भाजपचे पिंगला ब्राह्मणकर व निमगाव पं.स. क्षेत्रातून अरविंद शिवणकर विजयी झाले.
दुबळ्या नेतृत्वामुळे तालुक्यात काँग्रेसची वाताहत
By admin | Published: July 11, 2015 2:02 AM