गोंदिया : कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. बाधित रुग्णांपेक्षा मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ७ वर आली आहे. त्यामुळे जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, तर चार तालुके कोराेनामुक्त झाले आहे. त्यामुळे आठवडाभरात जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने मंगळवारी (दि.२०) ६७८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ५७७ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर १०८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी एकही नमुना कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. मागील दीड महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने घट होत असून, कोरोनाची दुसरी लाट आता पूर्णपणे ओसरली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत २११९०८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १८६७३२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत २२१०३९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १९९९५३ नमुने निगेटिव्ह आले. मंगळवारी जिल्ह्यात ३ बाधितांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत ४११७४ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी ४०४६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, ८१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
....................
कोरोनाचा रिकव्हरी रेट ९८.३० टक्के
कोरोनाबाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने कोरोनाचा रिकव्हरी रेट सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा रिकव्हरी रेट ९८.३० टक्क्यांवर पोहोचला आहे. तो राज्यापेक्षा दोन टक्क्यांनी अधिक आहे.
...................
४३१४१२ नागरिकांना कोरोनाचा पहिला डाेस
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केले जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत ४३१४१२ नागरिकांना कोरोनाचा पहिला डोस, तर १०७७२६ नागरिकांना कोरोनाचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५३९१३८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.