गोंदिया : मागील तीन-चार दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असून रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. मंगळवारी जिल्ह्यात चार बाधितांनी कोरोनावर मात केली; तर एका नवीन रुग्णाची नोंद झाली. एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने मंगळवारी १२७८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ६५२ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ६२६ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एक कोरोनाबाधित आढळला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.८ टक्के आहे. कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आली असून सद्य:स्थितीत ३५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत २००८०० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यांपैकी १७५१४४ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत २१८९५८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यांपैकी २१७८८३ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४११५४ कोरोनाबाधित आढळले असून यांपैकी ४०४४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ३५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ५७४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
.................
संसर्ग आटोक्यात; मात्र दुर्लक्ष नकोच
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आहे. त्यामुळे नागरिक पुन्हा बिनधास्तपणे वागत आहेत. मात्र धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नसून, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. तेव्हाच जिल्हा लवकर पूर्णपणे कोरोनामुक्त होऊ शकतो.