देवरी : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत असलेले बांधकाम विभागाचे वीज कनेक्शन वेळेवर वीज बिल न भरल्यामुळे वीज वितरण विभागाने दहा दिवसांपूर्वी विद्युत पुरवठा खंडित केला. अद्यापही विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्याने कार्यालयातील अनेक कामे ठप्प पडली आहे. याचा सर्वाधिक फटका घरकुल लाभार्थ्यांना बसत आहे.
बांधकाम विभागाची सर्व कामे ही संगणकावर होत असल्याने विद्युत पुरवठ्याअभावी ठप्प झाली आहेत. त्यामुळे ग्रा.पं.स्तरावरील घरकुल लााभार्थ्यांचे वीज असो किंवा गावातील रोड रस्ते, नाली बांधकामाचे बिल असो, हे बिल तयार करण्यात अडचण निर्माण होत आहे. हा प्रकार फक्त देवरीचे गटविकास अधिकारी चंद्रमणी मोडक यांच्या दुर्लक्षामुळे आणि दिरंगाईमुळे निर्माण झाला आहे. तरी याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी माजी पं.स. सदस्य अर्चना ताराम यांनी केली आहे. देवरी तालुका हा आदिवासी अतिदुर्गम व नक्षलग्रस्त आहे. येथील गोरगरीब लोकांना शासनाकडून त्याचे स्वस्त घराचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता घरकूल दिले आहे. घरकुलाची रक्कम पं.स.मधील बांधकाम विभागाकडून वितरण करण्यात येते. ग्रा.पं.स्तरावरील रस्ते, नाली बांधकामाचे बिल रक्कम याच विभागाकडून दिले जाते. या सर्व बिल बनविण्याचे काम हे संगणकावर केले जाते. परंतु बांधकाम विभागाचे वीज कनेक्शन मागील दहा दिवसापूर्वी कापण्यात आले. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना वेळेवर रक्कम न मिळाल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पं.स.च्या सर्व विभागाचे कोणतेही बिल असो ती बिले भरण्याची जवाबदारी आस्थापना विभागाची असते. पं.स.च्या सर्व विभागाची धुरा ही गटविकास अधिकारी यांच्यावर असते. बांधकाम विभागाची वीज कनेक्शन कापण्याची कारवाई झाल्यानंतर या विभागाचे अभियंता यांनी देवरीचे गटविकास अधिकारी मोडक यांना माहिती दिली. परंतु गटविकास अधिकारी मोडक यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून दुसऱ्या विभागाकडून बांधकाम विभागाला प्रवाह उपलब्ध करून देणे आवश्यक होते. परंतु अशी व्यवस्था न केल्याने गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
......
बांधकाम विभागाकडे पैसे नाही?
पं.स.च्या आस्थापनाकडूनही पर्यायी व्यवस्था म्हणून वीज कनेक्शन देण्याकरिता वापर खरेदी करण्याकरिता पैसे नाहीत. ही एवढी मोठी शोकांतिका आहे. अशाप्रकारे पंचायत समितीचे काम वाऱ्यावर सुरू आहे. या सर्व प्रकरणात वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी लक्ष घालून चौकशी करून दुर्लक्षित आणि दिरंगाईने वावरणाऱ्या गटविकास अधिकारी चंद्रमणी मोडक यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी माजी पं.स.सदस्य अर्चना ताराम यांनी यांनी केली आहे.