चिखली : वर्षभरापूर्वी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर होवूनही इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषदेला जागेचे हस्तांतरण करण्यास विलंब होत आहे. परिणामी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम अडले आहे. यामुळे मात्र चिखली व परिसरातील जनतेला आरोग्य सेवेपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. चिखली व परिसरातील गावांना खोडशिवनी येथील आरोग्य केंद्राला जोडण्यात आले आहे. हे केंद्र फार अंतरावर असल्याने या भागातील रुग्ण तेथे जात नाही. एक वर्षापासून एकाही रूग्णाची केंद्रातील ओपीडीमध्ये नोंद नाही. येथे यापूर्वी आयुर्वेदिक दवाखाना सुरू करण्यात आला होता. मात्र ‘१३ वने’ या लेखाशिर्षांतर्गत अपूरा निधी प्राप्त होत असल्याचे कारण दर्शवून सदर दवाखाना बंद करण्यात आला. त्यामुळे चिखली येथे आरोग्य केंद्र मंजूर व्हावे, अशी येथील जनतेची मागणी होती. त्या अनुशंगाने शासनाने येथे नवीन आरोग्य केंद्र मंजूर केले. मात्र पदभरती व इतर तत्सम कारणांमुळे अजूनपर्यंत आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले नाही. नवीन आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामासाठी चार कोटी ८० लाखांचा निधी जिल्हा परिषदेत पडून असल्याची माहिती आहे. मात्र महसूल विभागाकडून जिल्हा परिषदेला जमीन हस्तांतरण करण्यात विलंब होत असल्याने बांधकामास विलंब होत आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सरपंचांना नव्याने मंजूर झालेल्या आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी पत्र दिले. त्यानुसार ग्रामपंचायतने गावातील जमीन उपलब्ध करून दिली आहे. मात्र नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तयार होईपर्यंत आयुर्वेदिक दवाखाण्याच्या सुसज्ज इमारतीमध्येच आरोग्य केंद्र सुरू करावो अशी मागणी या परिसरातील जनता करीत आहे.
आरोग्य केंद्राचे बांधकाम अडले
By admin | Published: February 14, 2016 1:40 AM