कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला असून, दु:खाची बाब म्हणजे कोरोनामुळे दररोज रुग्णांचा जीव जात आहे. यामुळेच मंगळवारपर्यंत मृतांची संख्या २४५ पर्यंत पोहोचली असून, क्रियाशील रुग्णांची संख्या ५३६२ एवढी झाली आहे. विशेष म्हणजे, यातील ४०८९ रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत; मात्र अलगीकरणात असताना कित्येकांकडून नियमांचे पालन केले जात नसून, त्यांच्यापासून अन्य व्यक्तींना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता टाळता येत नाही. अशात अधिकाधिक रुग्ण असलेल्या परिसरांना आता कंटेन्मेंट झोन केले जात आहे.
यानुसार, जिल्ह्यात आतापर्यंत ४० कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले असून, दररोज बाधितांच्या वाढत्या संख्येनुसार त्यामध्ये वाढ केली जात आहे. मागील ४-५ दिवसांपासून दररोज कंटेन्मेंट झोनमध्ये वाढ होत असतानाच मंगळवारी वाढ न झाल्याने थोडाफार दिलासा मिळाला होता; मात्र बुधवारी जिल्ह्यात आणखी ४ कंटेन्मेंट झोनची भर पडली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गोरेलाल चौक परिसराला कंटेन्मेंट झोनमध्ये टाकण्यात आले असून, येथे ११ रुग्ण आहेत. शिवाय शहरातील गट्टाडोली परिसरालाही कंटेन्मेंट झोनमध्ये टाकण्यात आले असून, तेथे १६ रुग्ण आहेत. तर लगतच्या ग्राम कारंजा येथे व देवरी तालुक्यातील मोहगाव येथे कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहे.
------------------------------
शहरात आता १२ कंटेन्मेंट झोन
शहरात वाढत चाललेल्या बाधितांच्या संख्येमुळे आता १२ कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, लगतच्या ग्राम कारंजा व फुलचूरपेठ येथेही कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहे. मात्र बाजारातील गोरेलाल चौक परिसरात रुग्ण आढळून तो परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये टाकण्यात आल्याने आता एकच खळबळ माजली आहे.
---------------------------------
कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत ६६२ रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत ४४ कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील सर्वाधिक १२ कंटेन्मेंट झोन असून, उर्वरितांमधील काही गोंदिया तालुकासह अन्य तालुक्यांतील आहेत. या ४४ कंटेन्मेंट झोनमध्ये एकूण ६६२ रुग्ण असल्याची माहिती आहे. एवढ्या मोठ्या संख्येत एका-एका परिसरात रुग्ण निघत असल्याने आता परिस्थिती गंभीर झालेली दिसत आहे.