गोंदिया : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र एक्स्प्रेस या रेल्वे गाडीला रीवापर्यंत विस्तारीत करण्यात आले. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाला गोंदियावासीयांकडून विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र एक्स्प्रेस रेल्वे गाडीचे विस्तारीकरण रद्द करून केवळ कोल्हापूर ते गोंदियापर्यंतच ही चालवावी, अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीच्या शिष्टमंडळाने केली आहे. यासाठी समितीद्वारे मागणीचे निवेदन अपर मंडल प्रबंधकांना देण्यात आले आहे.
महाराष्ट्र एक्स्प्रेसला तत्कालीन मंत्री सुरेश कलमाडी यांनी हिरवी झेंडी दाखविली होती. तेव्हापासूनच या महाराष्ट्र एक्स्प्रेसला रीवापर्यंत विस्तारीत करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, सर्व स्तरावरून या निर्णयाचा विरोध करण्यात येत होता. महाराष्ट्र एक्स्प्रेस ही एकमात्र रेल्वे गाडी असून जी गोंदिया ते कोल्हापूरपर्यंत चालते. ही गाडी गोंदियाची शान आहे. या रेल्वे गाडीचा विस्तार रीवापर्यंत करण्यात आल्याने गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यातील प्रवाशांना त्रास होणार असून, हा निर्णय प्रवाशांच्या हिताचा नाही. या निर्णयामुळे रेल्वे प्रशासनाला विरोध करण्यात येत आहे. तसेच कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत प्रादुर्भाव मोठ्या वेगाने वाढत होता. त्यामुळे मुख्य बाजारातील तिकीट घराजवळील रेलटोलीकडे जाणाऱ्या रेल्वे पादचारी पूल बंद करण्यात आला आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, बाधितांची संख्या कमी असल्यामुळे जिल्हा अनलॉक करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्य बाजारातील पादचारी पूल सुरू करून प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात यावा, अशी मागणीही रेल्वे सल्लागार समितीच्या शिष्टमंडळाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन अपर मंडल प्रबंधकांना देण्यात आले आहे. निवेदन देताना, रेल्वे सल्लागार समितीचे सुरज नशीने, दिव्या भगत, लक्ष्मण लधानी, राजेंद्र कावळे, हरीश अग्रवाल, अकील नायक, स्मिता शरणागत, भेलूमन गोपलानी, छैलबिहारी अग्रवाल उपस्थित होते.