सरपंचपदी पपिता जांभूळकर : उपसरपंचपदी ऋषी झोळे अर्जुनी-मोरगाव : तालुक्यात दाट लोकवस्तीचे गाव समजल्या जाणारे महागाव (सिरोली) हे राजकीय घडामोडीसंदर्भात महत्वाचे समजले जाते. पट्टीचे राजकारणी असलेल्या या गावामध्ये राष्ट्रवादीचे कणखर व स्पष्टवादी नेते म्हणून ओळखल्या जाणारे महागाव निवासी प्राचार्य यशवंत परशुरामकर यांच्या कुशल नेतृत्व प्रणालीने राष्ट्रवादी काँग्रेसने ताबा मिळविला आहे.सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पपीता जांभुळकर यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी ऋषी झोळे यांची बहुमताने निवड करण्यात आली. महागाव ग्रामपंचायतच्या १३ सदस्यांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. नामनिर्देशनपत्र छाननीमध्ये काही उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने प्रकरण न्यायालयात गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलचे ५ उमेदवार अगोदरच अविरोध निवडून आले होते, तर ३ उमेदवार मतदान प्रक्रियेने विजयी घोषीत करण्यात आले. अतिशय चुरशीच्या या निवडणुकीत प्राचार्य यशवंत परशुरामकर यांच्या मार्गदर्शनात विरोधकांवर मात करून राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद बहुमत मिळवून ग्रामपंचायतवर आपला झेंडा रोवला आहे.न्यायालयीन आदेशान्वये घेतल्या गेलेल्या सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुकीत प्राचार्य यशवंत परशुरामकर यांनी महत्वाची भूमिका बजावली. मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महागाव प्रभागात पट्टीच्या राजकारण्यांवर मात करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्यातही त्यांनी यशस्वी राजकीय खेळी खेळली होती. या विजयामुळे परशुरामकर यांनी महागव क्षेत्रात आपले अस्तित्व कायम ठेवल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)
महागाव ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचा ताबा
By admin | Published: November 20, 2015 2:20 AM