अंगणवाड्या वाढल्या : १८ हजार विद्यार्थी रोडावले नरेश रहिले गोंदिया अंगणवाडीत सध्याच्या वातावरणात ‘प्ले विथ मेथड’ नसल्यामुळे अंगणवाडी ऐवजी कॉन्व्हेंटमध्ये चिमुकल्यांना पाठविण्याचा कल त्यांचा पालकांचा आहे. यामुळे अंगणवाडीची संख्या वाढत असली तरी विद्यार्थ्यांची संख्या रोडावत असल्याची माहिती पुढे आली आहे. अंगणवाडीत चिमुकल्यांचा प्रवेश होत नसल्यामुळे याचा परिणाम जि.प.शाळांवर होत आहे. ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना अंगणवाडीत टाकून त्यांचा मानसिक, शारीरिक व बौध्दीक विकास करण्यासाठी राज्याचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील २५ अंगणवाड्यांचे सर्वेक्षण करून त्यांना पायाभूत सुविधेसह स्मार्ट टीव्ही, टॅबलेट व अनुसांगीक साहित्य देऊन विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानयुक्त शिक्षण दिले जाणार आहे. यासाठी अदानी फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. मॉडेल म्हणून पाच अंगणवाड्याचे पथदर्शी युनिट सीएसआर प्रमुख नितीन शिराळकर यांनी तयार केले आहेत. अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना सर्व समावेशक आनंददायी, सोपी पध्दत व मनोरंजनात्मक अभ्यासक्रम देण्यासाठी शिक्षण विभाग व अदाणीने पुढाकार घेतला आहे. सेविकांना अद्ययावत प्रशिक्षण देणे, मराठी, इंग्रजी, गणित व सामान्यज्ञानावर आधारीत मासिकवार आनंददायी व सोप्या पध्दतीचा अभ्यास निर्धारीत केला आहे. सोप्या कविता, विविध खेळ यावर आधारीत प्राथमिक शिक्षण सक्षमीकरण महाराष्ट्र नावाची लिंक तयार करण्यात आली असून या अॅपचे काम अंतीम टप्यात आहे. सेविकांना लगतच्या जि.प.शाळेतील शिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. शाळा व अंगणवाडी यात आता समन्वय साधला जाणार आहे. पटसंख्या अभावी जि.प.शाळांच्या शिक्षकांची संख्या अतिरीक्त ठरत आहे. अंगणवाडीतील शिक्षण जि.प.शाळाच्या शिक्षकांना अतिरीक्त ठरवित आहेत. अंगणवाडीकडे विशेष लक्ष दिले जात नाही. याचा मागील पाच वर्षाचा तुलनात्मक अभ्यास केल्यास अंगणवाडी नंतर पहिल्या वर्गात बालकांना प्रवेश दिला जातो. जि.प.शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने याला जबाबदार अंगणवाडीचे शिक्षण आहे. सन २०११-१२ या वर्षात गोंदिया जिल्ह्यात आंगणवाडीची संख्या १ हजार ५२९ होती. तर बालकांची संख्या १ लाख ३ हजार ८६४ होती. सन २०१६-१७ या वर्षात आंगणवाडीची संख्या १ हजार ५४३ असून बालकांची संख्या ८५ हजार ९९७ इतकी आहे. म्हणजेच १७ हजार ८६७ बालके कमी झाली आहेत. चिमुकल्यांना अंगणवाडीत टाकण्यापेक्षा कॉन्व्हेंटमध्ये टाकले जात असल्याने कॉन्व्हेंटमध्ये जाणारी बालके सरळ खाजगी शाळांत पाठविली जातात. परिणामी जि.प.शाळांच्या पटसंख्येवर विपरीत परिणाम पडत आहे. १० लोकांनी केला अभ्यास २५ अंगणवाड्यांना स्मार्ट बनविण्यासाठी १० लोकांची चमू तयार करण्यात आली. त्या अभ्यास गटात तिरोड्याचे शिक्षण विस्तार अधिकारी एम.डी.पारधी, सर्व शिक्षा अभियानाचे जिल्हा समन्वयक बाळकृष्ण बिसेन, बाल विकास प्रकल्प अधिकारी कणकलता काळे, पदविधर शिक्षक नरेंद्र गौतम, अशोक चेपटे, गौतम बांते, किशोर गर्जे, राहुल कळंबे, मेरीटोरीयस पब्लीक स्कूलचे रक्षा ओक व उपमा परिहार यांचा समावेश आहे. अंगणवाडीत या भौतिक सुविधा असाव्या अंगणवाडी परिसर स्वच्छ व सुशोभीत, क्रिडांगण, फूलबाग, परसबाग, स्वच्छता व स्नानगृह असावे. कचराकुंडी, खेळ साहित्य, वर्गखोली, बैठक व्यवस्था, संगीत, तंत्रज्ञान, बाळकोपरा, विश्रामकोपरा, पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था, प्रथमोपचार पेटी, गणवेश, पाठ्यपुस्तके, अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण व लोकसहभाग असावा.
‘प्ले विथ मेथड’ अभावी चिमुकल्यांचा कल कॉन्व्हेंटकडे
By admin | Published: January 23, 2017 12:18 AM