लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून बांधितांची संख्या तीन आकड्यात वाढत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा तीनचा पाढा सुरु झाल्याने जिल्हावासीयांची काळजीत थोडी भर पडली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी सर्तकता बाळगता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काळजी घेण्याची गरज आहे. मागील दोन तीन दिवसांपासून कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत सुध्दा पुन्हा वाढ होत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात १२४ कोरोना बाधितांची नोंद झाली. तर देवरी तालुक्यातील २ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १ अशा तीन कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. तर ६६ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. शुक्रवारी आढळलेल्या १२४ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ७६ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तर तिरोडा ५, गोरेगाव १३, आमगाव ८, सालेकसा १, देवरी २, अर्जुनी मोरगाव ७ आणि सडक अर्जुनी तालुक्यातील १ आणि बाहेरील राज्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४३०९५ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ३२६२३ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरीत शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत आतापर्यंत ४५६५९ नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ४०९५३ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११२६७ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून यापैकी १०३८३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या स्थितीत ७३६ कोरोना ॲक्टीव्ह रुग्ण आहे. तर १५१ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
बाधितांची संख्या वाढतेय काळजीदिवाळीनंतर पुन्हा कोरोना बाधितांचा आलेख वाढण्यास सुरुवात झाली आहे. रुग्ण संख्या तीन आकड्यात वाढत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे काटेकोरपणे पालन करुन स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेण्याची गरज आहे.