अमरचंद ठवरे
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : घरामध्ये राजकारणाचा कोणताही गंध नाही. महिला व गावातील युवावर्गाला प्रोत्साहन देऊन त्यांच्यात गाव विकासामधील योगदान जागृत करण्याची अभिलाषा अंगी बाळगून एक २२ वर्षीय पदवीधर तरुणी पेटून उठते. क्षणात निवडणूक रिंगणात उडी घेऊन अपक्ष उमेदवार म्हणून मतदारांसमोर उभी राहते आणि पाहता-पाहता पहिल्याच प्रयत्नात निवडूनसुध्दा येते. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील कोरंभीटोला येथील तीर्थस्वरी उर्फ राणी हेमंत पोवळे असे त्या तरुणीचे नाव आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंभीटोला येथील ग्रामपंचायत निवडणूक होऊन निकालसुध्दा लागला. या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत उतरण्याचा संकल्प तीर्थस्वरी पोवळे या पदवीधर तरुणीने केला. तिच्या या धाडसी निर्णयाला आई, वडील, दोन लहान बहिणी, भाऊ यांनी मनापासून साथ दिली. ग्रामपंचायत कोरंभीटोला प्रभाग क्रमांक २ मधील सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून तीर्थस्वरीने आपली उमेदवारी पक्की करुन नामनिर्देशन पत्र सादर केले. कोणत्याही पॅनेलची साथ न घेता, ती रणरागिणीसारखी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरली. मतदारांच्या दारापर्यंत गेली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यामागची भूमिका मतदारांना पटवून दिली. प्रभागातील मतदारांचा विश्वास, पाठिंबा तिला हळू-हळू मिळू लागला. काहींनी तीर्थस्वरीच्या उमेदवारीची दखल घेतली नाही. प्रतिभासंपन्न असलेल्या या तरुणीने गावच्या राजकारणात करिश्माच केला. गावाच्या विकासासबंधीचे प्रश्न, महिलांचे सक्षमीकरण करणे, ग्रामसभेत उपस्थित राहण्यासाठी महिलांना प्रवृत्त करणे, युवावर्गाला योग्य ते मार्गदर्शन करुन ग्रामपंचायतीच्यावतीने स्पर्धात्मक परीक्षेसबंधीचे वाचनालय सुरु करणे, व्यायामशाळा सुरु करुन गावात व्यसनाधिनतेचे प्रमाण कमी करण्यासाठी काम करण्याचा निर्धार या तरुणीने केला आहे.
....
राजकारणाचा अनुभव नाही
यापूर्वीचा कोणताही राजकीय अनुभव नाही. घरामध्ये राजकीय सहभागाचा कुठलाही वारसा नाही. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना, राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात ती सक्रिय सहभाग घेत होती, असे तीर्थस्वरीने सांगितले. युवा पिढीला प्रोत्साहन मिळावे म्हणूनच ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहायचे ठरवले. ग्रामपंचायत सदस्य म्हणून प्रथम महिलांना ग्रामसभेत उपस्थित राहण्यासाठी प्रवृत्त करणार आहे. ग्रामसभेतून महिलांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तिने सांगितले.